ना तपासणी ना परवानगी ! वाळूज महानगरात शेकडो अनधिकृत आरओ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 01:19 PM2018-03-15T13:19:13+5:302018-03-15T13:19:55+5:30

वाळूज औद्योगिकनगरीत शेकडो अनधिकृत जलशुद्धीकरण केंदे्र (आरओ प्रकल्प) सुरूआहेत. शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोअरचे पाणी फिल्टर करून जारमधून या पाण्याची विक्री जोरात सुरू आहे.

Not allowed to check! Hundreds of unauthorized RO projects in the Walaj Metropolitan | ना तपासणी ना परवानगी ! वाळूज महानगरात शेकडो अनधिकृत आरओ प्रकल्प

ना तपासणी ना परवानगी ! वाळूज महानगरात शेकडो अनधिकृत आरओ प्रकल्प

googlenewsNext

- महेमूद शेख 

वाळूज महानगर : वाळूज औद्योगिकनगरीत शेकडो अनधिकृत जलशुद्धीकरण केंदे्र (आरओ प्रकल्प) सुरूआहेत. शुद्ध पाण्याच्या नावाखाली बोअरचे पाणी फिल्टर करून जारमधून या पाण्याची विक्री जोरात सुरू आहे. जारच्या दूषित पाणी विक्रीतून पाणी व्यापारी नागरिकांच्या जिवाशी खेळ करीत आहेत. अन्न व औषधी प्रसाधन तसेच स्थानिक प्रशासन याकडे कानाडोळा करीत असल्यामुळे पाणी विक्रीचा व्यवसाय औद्योगिकनगरीत जोमात सुरूआहे.

या परिसरातील बजाजनगर, म्हाडा कॉलनी, सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, रांजणगाव, कमळापूर, जोगेश्वरी, वाळूज, पंढरपूर आदी ठिकाणी जलमाफियांनी ब्युरो आॅफ इंडियन स्टॅनर्ड (बीआयएस)ची परवानगी न घेता स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून आरओ प्रकल्प सुरूकेले आहेत. या परिसरातील जलसाठे दूषित झाल्यामुळे बहुतांश नागरिक पिण्यासाठी जारचे पाणी वापरतात. ग्रामपंचायतीकडून मुबलक प्रमाणात शुद्ध पाणीपुरवठा होत नसल्यामुळे जारद्वारे पाणी विक्रेत्याचे फावते आहे. बोअर अथवा एमआयडीसीचे पाणी जारमध्ये भरून अनेक व्यावसायिक शुद्ध पाणी म्हणून खुलेआम विक्री करीत आहेत.

विशेष म्हणजे अनेकांनी राहत्या घरी बोअर घेऊन तर काहींनी चक्क एमआयडीसीचे पाणीच जारमध्ये भरून विक्री सुरूकेली आहे. आजघडीला या भागात ३००च्या जवळपास विना परवाना आरओ प्रकल्प सुरूअसून लोडिंग रिक्षा, छोटा हत्ती आदी वाहनांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचे जार भरून कारखाने, हॉटेलचालक, विविध व्यावसायिक व नागरी वसाहतीमधून या जारची विक्री केली जात आहेत. 

तीन वर्षांपूर्वी वाळूज एमआयडीसी परिसरात अन्न व औषधी विभागाकडून विना परवाना बाटली बंद पाण्याच्या विक्री करणार्‍या काही व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. मात्र, या मोहिमेत सातत्य नसल्यामुळे आजघडीला औद्योगिकनगरीत मोठ्या प्रमाणात शुद्ध पाण्याच्या नावाखाली बंद जारच्या पाण्याची विक्री खुलेआमपणे सुरूआहे. पाणी विक्री करणारे व्यावसायिक बोअर अथवा इतर ठिकाणांवरून जमा झालेले पाणी मोठ्या टाकीत साठवून ठेवतात. या पाण्याला मिनरल वॉटरसारखा सुगंध यावा, यासाठी या पाण्यात रासायनिक द्रव्य मिसळतात. त्यामुळे नागरिकांना शुद्ध पाण्याची चव येत असल्यामुळे या पाण्याविषयी कुणालाही संशय येत नाही. मुळातच बहुतांश आरओ प्रकल्प विना परवाना सुरू असल्यामुळे या पाण्याची प्रयोगशाळेत तपासणी केली जात नाही. शुद्ध पाण्याच्या नावाखाली पाणी विक्रेते अशुद्ध पाणी विक्री करीत असल्यामुळे पोटदुखी, कावीळ आदी आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

खर्च वाचविण्यासाठी विना परवाना प्रकल्प
एका व्यावसायिकाशी अनौपचारिक चर्चेतून समोर आलेल्या माहितीनुसार बीएसआयची परवानगी घेऊन प्रकल्प सुरू करण्यासाठी जवळपास १० लाखांचा खर्च येतो. प्रकल्प सुरू केल्यानंतर नियमितपणे प्रयोगशाळेत या पाण्याची तपासणी करण्यात येते. याशिवाय पाण्याची शुद्धता तपासणीसाठी केमिस्टही नेमावा लागतो. अनेक व्यावसायिक खर्च वाचविण्यासाठी विना परवाना आरओ प्लँट थाटून पाण्याची विक्री करणे पर्यायाने सोपे आहे. 

जिल्ह्यात ३० विक्रेत्यांकडे परवाने
अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त ए.जी.पारधी यांनी सांगितले की, अन्न व सुरक्षा कायद्यांतर्गत पॅकेज्ड ड्रिकिंग वॉटर (बाटलीबंद पाणी उत्पादन, साठा व विक्री) यासाठी बीआयएस परवाना घेणे बंधनकारक आहे. याशिवाय बाटली बंद विक्री करण्यासाठी स्थानिक प्रशासन, अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ३० व्यावसायिकांकडे पॅकेजिंक ड्रिकिंग वॉटरचे परवाने आहेत. विना परवाना पाणी विक्री करणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध स्थानिक ग्रामपंचायत, एमआयडीसी व सिडको प्रशासनाने कारवाई करण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. 
-ए.जी पारधी (सहा. आयुक्त अन्न व औषधी प्रशासन)

Web Title: Not allowed to check! Hundreds of unauthorized RO projects in the Walaj Metropolitan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.