आरटीई प्रतिक्षा यादीत 'नॉट ॲप्राेच' नावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2020 02:33 PM2020-10-07T14:33:19+5:302020-10-07T14:33:49+5:30
गेली ३ महिने ज्या विद्यार्थ्यांनी शाळांना भेट दिली नाही किंवा प्रवेशही निश्चित केला नाही, अशा नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार आरटीई पालक संघाने समोर आणला आहे.
औरंगाबाद : आरटीईअंतर्गत मोफत प्रवेश प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यात प्रतिक्षा यादीतील प्रवेश सुरू आहेत. पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रियेत पात्र, पण गेली ३ महिने ज्या विद्यार्थ्यांनी शाळांना भेट दिली नाही किंवा प्रवेशही निश्चित केला नाही, अशा नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार आरटीई पालक संघाने समोर आणला आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची नावे गेली कुठे, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शालेय प्रवेशात २५ टक्के आरक्षणाची तरतूद आहे. आरटीईअंतर्गतची प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यातील ५८४ शाळांमध्ये ऑनलाईन राबविण्यात येत आहे. आरटीईसाठी १६,५०० पेक्षा अधिक अर्ज आले होते. त्यापैकी ५,६७६ विद्यार्थ्यांची निवड झाली, तर १९१४ जणांची सोडतीनुसार प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली.
पहिल्या फेरीत ३ हजार १०१ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. उर्वरित १५३९ जागांसाठी प्रतीक्षा यादी जाहीर झाली. ३ ते ८ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा यादीतील प्रवेश सुरू आहेत. आर. जे. इंटरनॅशनल शाळेच्या प्रतीक्षा यादीत ९ नॉट ॲप्रोच विद्यार्थी घुसविण्यात आल्याचा प्रकार संघाच्या प्रशांत साठे यांनी समोर आणला आहे. हे सर्व उदाहरण असून सर्वच याद्यांमध्ये घोळ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नॉट ॲप्रोच विद्यार्थ्यांचा समावेश प्रतीक्षा यादीत केल्याने आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांवर अन्यायच झाल्याचा आरोप साठे यांनी केला.