विकासाची नव्हे, दुर्लक्षाची ‘हद्द’ वाढली !
By Admin | Published: December 29, 2014 12:54 AM2014-12-29T00:54:53+5:302014-12-29T00:56:12+5:30
उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला!
उस्मानाबाद : ना ग्रामसभा़़ ना दवंडी़़ थेट उस्मानाबाद शहराच्या हद्दवाढीत समावेश! सहा वर्षांत काय दिलं ? तर मुख्य मार्गासह दलित वस्ती या दोन ठिकाणी रस्ते तेही नावाला! अन् काही खांबावरील पथदिवे़़ गावातील एकही रस्ता धड नाही़़़ देवळासमोरून गटारीचं पाणी वाहतय़़़ त्या पाण्यातूनच देवळात जावं लागतय़़ झोपडपट्टी भागात वर्षभरापासून पाण्याचा थेंबही पोहोचलेला नाही़़ अशा एक ना अनेक समस्यांचा पाढा हद्दवाढीत उस्मानाबाद शहरात समाविष्ठ झालेल्या राघुचीवाडी येथील नागरीकांनी ‘लोकमत’शी बोलताना वाचला ! गावात घंटागाडी येत नाही, ना लोकप्रतिनिधीकडून विचारणा होते, अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली़
सन २००८ मध्ये उस्मानाबाद शहराची हद्दवाढ झाली़ शहरापासून साडेसहा ते सात किलोमीटर अंतरावर वसलेल्या राघुचीवाडी या गावाचा समावेश झाला़ राघुचीवाडी ग्रुपग्रामपंचायतीत असलेल्या केकस्थळवाडी आणि जाधववाडी ही गावेही शहराला जोडण्यात आली़ गावाचा शहरात समावेश झाल्यापासून ग्रामस्थांनी याला विरोध सुरू केला आहे़ साधारणत: २५०० लोकवस्तीच्या या गावात ना धड रस्ता, ना पिण्याच्या पाण्याची सोय आहे! एक ना अनेक समस्यांनी ग्रामस्थांना ग्रासले आहे़ गावातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत ‘लोकमत’ने रविवारी प्रत्यक्ष ग्रामस्थांशी संवाद साधला़ त्यावेळी ग्रामस्थांनी अनेक प्रश्न समोर मांडले़ गावात प्रवेश केल्यानंतर साधारणत: ८० मीटरपर्यंत सिमेंटचा रस्ता आहे़ प्रारंभी गावातील चांगले वाटणारे रस्ते नंतर खड्डे आणि दगडामुळे चालायलाही नकोशे वाटतात़ गावातील एकही गटार व्यवस्थित नसल्याने पाणी रस्त्यावरूनच वाहत आहे़ गावाच्या मध्यभागी असलेल्या मारूती मंदिराच्या पायऱ्या चढायच्या म्हटले तरी गटारीचे पाणी तुडवतच मंदिरात जावे लागते़ गावात ठिकठिकाणी कचरा पडलेला दिसून येतो़ नगर पालिकेने घंटागाडीद्वारे कचरा उचलण्याची सोय केली़ मात्र, राघुचीवाडी गावात कधी घंटागाडी फिरकलीच नाही़ स्वच्छता कर्मचाऱ्यांचाही पत्ता नाही़ परिणामी गावातील स्वच्छतेच्या समस्या कायम आहेत़ गावाच्या कडेला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी टाकी उभारण्यात आली आहे़ ही टाकी कालबाह्य झाली असून, ठिकठिकाणी गळती लागली आहे़ टाकी केव्हा कोसळेल याचा पत्ता नाही़ त्यामुळे परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे़ अशा धोकादायक टाकीत पाण्याचा साठा करून अर्ध्या गावाला पुरवठा होत आहे़ झोपडपट्टी भागातील पाणीपुरवठ्याची पाईपलाईन खराब झाली आहे़ त्यामुळे दारात नळ असतानाही गत वर्ष-दीड वर्षापासून ग्रामस्थांना हातपंपाचे पाणी भरावे लागत आहे़ गाव पालिका हदीत गेल्याने अनेक शासकीय योजनांचा लाभ घेताना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. दरम्यान, गावाला पुन्हा ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, या संदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल केली असल्याचे ग्रामस्थांतून सांगण्यात आले.
न.प.ची पावती, नाव ग्रामपंचायतीचे
राघुचीवाडी येथील विठ्ठल शंकर कसपटे यांनी आॅगस्टमध्ये आठ अ साठी ९३० रूपये व १५० रूपये असा विविध करांचा भरणा केला आहे़ त्याबद्दल पालिकेने त्यांना पावती दिली असून, ग्रामपंचायत राघुचीवाडी हा उल्लेख त्यावर आहे़ केवळ गावाचे नाव असते तर ठिक मात्र, त्यात ग्रामपंचायतीचा उल्लेख असल्याने गावात राहतो की शहरात राहतो ? हा प्रश्न कायम असल्याचेही अनेकांनी सांगितले़
तर भरत माळी यांनी अंबुबाई माळी यांच्या नावावर आठ अ काढण्यासाठी तीन-चार महिन्यापूर्वी ६८०० रूपये पालिकेत भरले आहेत़ चार महिने झाले मात्र, विविध कारणास्तव प्रमाणपत्र दिले नसल्याचे भरत माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़ (प्रतिनिधी)