दुभाजक नव्हे, ही तर टेकडीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:02 AM2021-02-22T04:02:16+5:302021-02-22T04:02:16+5:30
औरंगाबाद : महावीर चौक ते हर्सूल टी पॉईंट पर्यंतचा रस्ता व्हीआयपी म्हणून घोषित केला आहे. या रस्त्यावर चार दिवसांपूर्वी ...
औरंगाबाद : महावीर चौक ते हर्सूल टी पॉईंट पर्यंतचा रस्ता व्हीआयपी म्हणून घोषित केला आहे. या रस्त्यावर चार दिवसांपूर्वी मोठ-मोठे गतिरोधक टाकण्यात आले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. शनिवारी दिवसभरात पाच गंभीर अपघात झाले. इंडियन रोड काँग्रेसने ठरवून दिलेल्या नियमानुसार गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढत आहे.
केंद्र शासन ‘फास्टॅग’मुळे राष्ट्रीय महामार्गावरील गतिरोधक काढून टाकण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. औरंगाबाद शहरात प्रशासन सर्व निकष नियम धाब्यावर बसवून चक्क व्हीआयपी रोडवर मोठमोठे गतिरोधक टाकत आहे. डांबरी रस्ते तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा उपयोग करून शहरातील व्हीआयपी रोडवर एकूण पाच ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. किलेअर्क येथे दोन, जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानासमोर एक, हिमायतबाग येथे दोन गतिरोधक टाकण्यात आले आहेत. या गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत. गरजेपेक्षा जास्त उंची आहे. वाहनधारकांना गतिरोधक नव्हे, तर टेकडी वाटत आहे.
व्हीआयपी रोडवर गतिरोधक टाकलेच कसे असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून टाकण्यात आलेल्या सर्व गतिरोधक काढून टाकावेत. गतिरोधक टाकायचे असतील तर छोटे रबरचे गतिरोधक टाकावेत, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
चौकट..
दिवसभरात पाच अपघात
काही वाहनधारकांना गतिरोधक दिसत नाही का, मुळे अचानक ब्रेक मारत आहेत. त्यामुळे पाठीमागील वाहन येऊन धडकत आहे. काही वाहनधारक गतिरोधकावरून घसरून पडत आहेत. शनिवारी दिवसभरात पाच अपघात झाले.