सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2022 06:48 PM2022-02-04T18:48:58+5:302022-02-04T18:49:38+5:30

जागतिक कर्करोग दिन: वृद्धच नवे, तर खेळण्या- बागडण्याच्या वयातही गाठतोय कॅन्सर

Not everything ends there; Complete cure of cancer with treatment | सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा

सगळे संपते असे नाही;वेळीच निदान, उपचाराने कॅन्सर होतो पूर्ण बरा

googlenewsNext

- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : आम्ही तर कधी गुटखा, तंबाखू खाल्ली नाही, मग आम्हाला का कॅन्सर झाला, असा प्रश्न काही चिमुकल्यांकडून कुटुंबीयांना विचारला जातो, तर कधी डाॅक्टरांना. वृद्धच नवे, तर खेळण्या - बागडण्याच्या वयातही काहींना कॅन्सर होत आहे. अगदी तीन महिन्यांचे चिमुकलेही शासकीय कर्करोग रुग्णालयात दाखल होतात. मात्र, कॅन्सर झाला म्हणे सगळे संपले नाही, वेळीच निदानाने कॅन्सर बरा होतो, असे तज्ज्ञांनी ‘लोकमत’ला सांगितले.

दरवर्षी ४ फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून पाळण्यात येतो. ‘क्लोज द केअर गॅप’ ही २०२२ ते २०२४ ची संकल्पना आहे. प्रत्येकालाच कॅन्सरच्या निदानापासून ते उपचाराची आरोग्यसेवा, सुविधांची माहिती असायला हवी, याने अकाली मृत्यू थांबविणे शक्य आहे. औरंगाबादेतील शासकीय कर्करोग रुग्णालय आता संपूर्ण राज्यातील रुग्णांसाठी आधारवड ठरतेय. रुग्णालयाला राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ होत आहे.

सर्वोत्कृष्ट रुग्णसेवेसाठी प्रयत्न
विविध प्रकारच्या कर्करोगांचे रुग्ण रुग्णालयात दाखल होतात. रुग्णालयाच्या विस्तारीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. विस्तारीकरणामुळे सोयी-सुविधांत वाढ होईल.
- डाॅ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, शासकीय कर्करोग रुग्णालय

काय म्हणतात तज्ज्ञ....?
 

जनरल प्रॅक्टिशनरची जबाबदारी महत्त्वाची
३० वर्षांवरील महिलांनी दरवर्षी स्त्रीरोगतज्ज्ञांकडे तपासणी केल्यास गर्भाशयमुखाच्या कॅन्सरचे निदान प्रारंभिक स्थितीत होऊ शकते. ग्रामीण भागातील जनरल प्रॅक्टिशनरनाही कॅन्सरबद्दल माहिती असावी. जेणेकरून ते वेळेवर रुग्णांना मार्गदर्शन करू शकतील. कारण ग्रामीण भागात रुग्ण सर्वप्रथम त्यांच्याकडेच जातात.
- डाॅ. अर्चना राठोड, सहयोगी प्राध्यापक, स्त्री कर्करोग विभाग

कॅन्सरमध्ये ४ टक्क्यांनी वाढ
गेल्या २० वर्षांत कॅन्सर ४ टक्क्यांनी वाढला. ३० टक्के रुग्णांचे वय ५० वर्षांपेक्षा कमी आहे, ही बाब चिंताजनक आहे. २०१० मध्ये वर्षभरात २५० शस्त्रक्रिया होत. आता १२०० ते १५०० शस्त्रक्रिया होतात. तोंडाच्या कर्करोगाचे प्रमाण सर्वाधिक आहे.
- डाॅ. अजय बोराळकर, सहयोगी प्राध्यापक, कर्करोग शल्यचिकित्सा विभाग

आधुनिक उपचार
तरुणांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी व्यसन प्रमुख कारण आहे. शेतात रासायनिक खतांचा होणारा वापरही कारणीभूत ठरत आहे. परंतु, कॅन्सरवर आधुनिक उपचार उपलब्ध आहेत.
- डाॅ. बालाजी शेवाळकर, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख

पूर्वी बालरुग्ण दुर्मीळ, आता वाढ
बालकांमध्ये कॅन्सर आढळणे, हे पूर्वी दुर्मीळ होते. परंतु, आता हे प्रमाण वाढत आहे. बालकांत रक्ताच्या कॅन्सरचे प्रमाण अधिक आहे. त्याबरोबर हाडाचे, किडनी, लिव्हरचे कर्करोग मुलांमध्ये आढळतात. वेळीच निदान झाले तर त्यावर मात करता येते.
- डाॅ. आदिती लिंगायत, बालकर्करोग विभागप्रमुख

गेल्या वर्षभरातील कर्करोग रुग्णांची स्थिती (शासकीय कर्करोग रुग्णालय)
-बाह्यरुग्ण विभाग- ६२५९
- आंतररुग्ण विभाग- ३९४८
- मोठ्या शस्त्रक्रिया- ८४२
- छोट्या शस्त्रक्रिया- ८४९
- डे केअर- १२,७८५
- आयसीयू- ६०७
- मृत्यू- १८०

Web Title: Not everything ends there; Complete cure of cancer with treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.