कचरा नव्हे, सोनेच!; औरंगाबादमध्ये आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:51 AM2018-03-14T00:51:40+5:302018-03-14T15:09:36+5:30

कचर्‍याची कोंडी फुटावी या दृष्टीने महापालिका काम करायला तयार नाही. उलट महापालिकेसाठी कचरा सोन्याची खाण ठरत आहे.

Not garbage, gold! | कचरा नव्हे, सोनेच!; औरंगाबादमध्ये आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

कचरा नव्हे, सोनेच!; औरंगाबादमध्ये आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

googlenewsNext
ठळक मुद्देकच-याचे अर्थकारण : आऊटसोर्सिंगच्या नावावर अक्षरश: लूट

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : शहरातील १५ लाख नागरिक मागील एक महिन्यापासून कचराकोंडीने त्रस्त झालेले आहेत. कचर्‍याची कोंडी फुटावी या दृष्टीने महापालिका काम करायला तयार नाही. उलट महापालिकेसाठी कचरा सोन्याची खाण ठरत आहे. कचरा उचलण्याच्या प्रक्रियेच्या मुळाशी गेल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कचरा उचलण्यासाठी भाडेतत्त्वावर तब्बल १३६ रिक्षा घेण्यात आल्या आहेत. एका रिक्षाचे भाडे महिना २७ हजार रुपये आहे. वर्षाला रिक्षाच्या भाड्यापोटी मनपा ४ कोटी ४७ लाख रुपये खर्च करीत आहे. याशिवाय आणखी बरीच वाहने भाडेकरारावर घेतली आहेत. सर्वांचे वर्षाला भाडेच दहा कोटी रुपये होत आहे.

शहरातील कचराकोंडी फुटावी असे मनपालाही वाटत नाही. कचरा प्रश्नाच्या नावावर सुरू असलेली दुकानदारी आणखी कशी मोठी होईल, याचाच विचार अधिकारी, कर्मचारी करीत आहेत. कचरा उचलण्याच्या कामाचे चक्क आऊटसोर्सिंग केले आहे. प्रत्येक कामासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमून ठेवला आहे. त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून या प्रक्रियेत काम करणार्‍या मंडळींनी ‘भर अब्दुल्ला...’ याप्रमाणे कचर्‍याला सोन्याची खाणच बनवून टाकले आहे. 

११५ वॉर्डांमधील कचरा उचलण्यासाठी मनपाच्या यांत्रिकी, घनकचरा विभागाने २४५ रिक्षा कामाला लावल्या आहेत. त्यातील १३६ रिक्षा भाडेतत्त्वावरील आहेत. एका रिक्षाचे भाडे दररोज ९०० रुपये आहे. महिन्याला २७ हजार, वर्षाला ३ लाख २४ हजार रुपये एका रिक्षापोटी मनपा खर्च करीत आहे. एका वॉर्डाला दोन, तर काही वॉर्डांना तीनही रिक्षा देण्यात आल्या आहेत. १३६ रिक्षांचे महिन्याला भाडे ३७ लाख २६ हजार रुपये होते. वर्षाला ही रक्कम ४ कोटी ४७ लाखांपर्यंत जाते. रिक्षांची संख्या अधिक दाखवून निव्वळ मनपाच्या तिजोरीची लूट सुरू असल्याचा आरोपही होत आहे. मनपा भाड्यावर जेवढा पैसा खर्च करते तेवढ्या रकमेत तर नवीन रिक्षांची खरेदी झाली असती.

डम्पर, ट्रॅक्टरचे स्वतंत्र कंत्राट
वॉर्डांमध्ये जमा झालेला कचरा उचलण्यासाठी ४० ते ५० मोठी वाहने भाडेकरारावर लावली आहेत. या कामावरही दरवर्षी २ कोटींहून अधिक रक्कम खर्च करण्यात येत आहे. ही वाहने नेमकी कुठे आणि कधी धावतात, हे फक्त यांत्रिकी विभागालाच माहीत.

चालकही आऊटसोर्सिंगवर
भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली काही वाहने चालविण्यासाठी आणखी एका कंत्राटदाराकडून वाहनचालक घेण्यात आले आहेत. त्यांच्या पगारापोटी दरमहा लाखो रुपये मनपाला द्यावे लागत आहेत.

कंत्राटदारांची लागली रांग
कचर्‍यावर प्रक्रिया करणे, यंत्रसामग्री खरेदी करा, असे म्हणत मनपाकडे आतापर्यंत ७० पेक्षा अधिक प्रस्ताव आले आहेत. दररोज किमान आठ ते दहा कंत्राटदार वेगवेगळे प्रकल्प घेऊन मनपात येत आहेत.प्रत्येक जण कचर्‍यावर प्रक्रिया करणारे आपले टेक्निक सर्वोत्तम असल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे मनपाला शहरातील कचरा आणखी सोन्याची खाण असल्याचे वाटू लागले आहे.सोमवारी महापालिकेने कचर्‍यापासून वीजनिर्मितीसाठी इच्छुक कंपन्यांचे प्रस्ताव मागविल्याचे जाहीर केले. मात्र, निविदेत नेमके असे काहीच म्हटले नाही. कचर्‍यावर प्रक्रिया एवढेच लिहिले आहे. 

Web Title: Not garbage, gold!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.