आडातच नाही, तर पोहोऱ्यात कुठून; कोट्यवधीचा खर्च केल्यानंतरही जलजीवन मिशनला अपयश
By विजय सरवदे | Published: April 11, 2024 06:44 PM2024-04-11T18:44:27+5:302024-04-11T18:44:42+5:30
छत्रपती संभाजीनगरातील पाण्याचे स्रोत आटले
छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील प्रत्येक घराला ३१ मार्च २०२४ अखेर नळाद्वारे शुद्ध पाणी देण्यासाठी जलजीवन मिशनच्या माध्यमातून जिल्ह्यात १ हजार १५९ योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु, मागील दोन - तीन वर्षांत यापैकी केवळ ६६६ योजनांची कामे पूर्णत्त्वाकडे गेली असून, जवळपास ५०० कामे अजूनही २५ ते ७५ टक्क्यांपर्यंत सुरू आहेत. तथापि, या योजनांवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करूनही यंदा जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांनी तळ गाठल्यामुळे अपेक्षित यश गाठता आले नाही.
टंचाईग्रस्त गावांचा पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी जलजीवन मिशन टंचाईग्रस्त जिल्ह्यात १,१५९ योजनांच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले. यासाठी ६७७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. यातील काही कामांची जबाबदारी जीवन प्राधिकरणांवरही देण्यात आली आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून जि. प. पाणीपुरवठा विभागाने १,१५९ योजनांच्या कामे गतीने व्हावीत, यासाठी सातत्याने कंत्राटदार व ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा केला. मात्र, काही ठिकाणी ग्रामस्थ, सरपंच व कंत्राटदारांमध्ये बेबनाव झाल्यामुळे काही कामे रखडली. मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सरपंच, ग्रामसेवक व कंत्राटदारांच्या बैठका घेऊन तक्रारी ऐकून घेतल्या. तरीही कामे सुरू करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ४५ कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
योजनांची कामे पूर्ण झालेल्या गावातील प्रत्येक कुटुंबातील दरमाणसी ५५ लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्ह्यातील ४ लाख ८७ हजार ८८२ घरांना नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार आजपर्यंत ३ लाख ९७ हजार ९०१ घरांना नळजोडणी देण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी पाण्याचे स्रोत आटल्यामुळे नळाला कधी आठ दिवसांतून, तर अनेक ठिकाणी नळ कोरडेच असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.
सहा महिन्यांची मुदतवाढ
मार्च २०२४ अखेरपर्यंत जलजीवन मिशनची कामे पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने मुदत दिली होती. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास निम्मी कामे अपूर्णावस्थेत असल्यामुळे शासनाने ६ महिने अर्थात सप्टेंबरअखेरची मुदतवाढ दिली आहे.
कामांची सद्यस्थिती
० ते २५ टक्के- २६ ते ५० टक्के- ५१ ते ७५ टक्के- ७६ ते १०० टक्के
६० कामे- १९४ कामे- २१९ कामे- ६६६ कामे