कर्नाटक नव्हे, भगवान नृसिंहाचे दर्शन छत्रपती संभाजीनगरातच
By प्रशांत तेलवाडकर | Published: April 28, 2023 12:36 PM2023-04-28T12:36:05+5:302023-04-28T12:36:32+5:30
जुन्या शहरात केळी बाजारात तब्बल १५० वर्षे जुने ‘नृसिंह मंदिर’ आहे.
छत्रपती संभाजीनगर : भगवान विष्णूच्या १० पैकी चौथा अवतार म्हणजे ‘भगवान नृसिंह’ अवतार होय. छत्रपती संभाजीनगरातील नृसिंह भक्तांना आता भगवंताचे दर्शन घेण्यासाठी कर्नाटकातील बीदर, तेलंगणातील धरमपुरी, बिहार किंवा नेपाळ याठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. कारण, आपल्याच शहरात नृसिंहाची एक नव्हे, दोन मंदिरे आहेत. तिथे नृसिंह जयंती नवरात्रोत्सव सुरू झाला आहे.
लक्ष्मी-नृसिंह मंदिर
जुन्या शहरात केळी बाजारात तब्बल १५० वर्षे जुने ‘नृसिंह मंदिर’ आहे. एका चिंचोळ्या गल्लीत हे ‘लक्ष्मी-नृसिंह’ मंदिर आहे. पूर्वी हे मंदिर संपूर्ण माती व चुन्यात बांधलेले होते. नंतर जीर्णोद्धार करण्यात आला. मात्र, काळ्या पाषाणातील लक्ष्मी-नृसिंहाची मूर्ती दीडशे वर्षे जुनी आहे. मूर्तीचा चेहरा चांदीने सजविण्यात आलेला आहे, तसेच ओट्यावर श्रीगणेश, हनुमान, नंदी- महादेव व गुरुदेव दत्तांचेही दर्शन होते. दत्तात्रेयांची मूर्ती एकमुखी असून, समोरच दत्तगुरूंच्या पादुका व शिलालेख आहे.
पैठण रोडवरील नृसिंह मंदिर
५ ते ७ वर्षांपूर्वी स्व. सरमाळकर यांच्या पुढाकाराने पैठण रोडवर ‘लक्ष्मी-नृसिंह’चे मंदिर उभारण्यात आले. हिंदुस्तान आवासजवळ सुखवस्तू कॉलनीत हे मंदिर आहे. विविध प्रकारच्या झाडाझुडपांच्या सान्निध्यात हे मंदिर खूपच सुंदर आणि भव्य आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी एका उंच आसनावर लक्ष्मी-नृसिंहांची मूर्ती दिसते. काळ्या पाषाणातील मूर्तीत नृसिंहाचे रौद्ररूप दिसते. बाजूला लक्ष्मी विराजमान आहे. भक्त प्रल्हाद हात जोडून नमस्कार करतात, अशी ही सुंदर मूर्ती आहे, अशी माहिती मंदिरांचे अभ्यासक प्रा. डॉ. अनिल मुंगीकर यांनी दिली.
४ मेला नृसिंह जयंती
भगवान नृसिंह नवरात्रोत्सवाला बुधवारी २६ एप्रिलला सुरुवात झाली. ज्यांचे कुलदेवत भगवान नृसिंह आहे, ते नऊ दिवस उपवास करतात. यंदा गुरुवारी ४ मेला नृसिंह जयंती साजरी करण्यात येणार आहे.