गुजरातसारखी स्थिती नाही, राज्यातील औद्योगिक वीजपुरवठा सुरळीत : नितीन राऊत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 07:05 PM2022-04-13T19:05:11+5:302022-04-13T19:05:30+5:30
अधिकची वीज येत्या आठवडाभरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता
औरंगाबाद : विजेचे संकट संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेले आहे आणि यास कारणीभूत म्हणजे कोळशाचा अपुरा पुरवठा. यामुळे आंध्र प्रदेश सरकारने ५० टक्के वीज कपातीचे धोरण अवलंबिले आहे. गुजरात राज्यात औद्योगिक ग्राहकांसाठी आठवड्यातून एक दिवस वीजपुरवठा न करण्याचे धोरण राबवत आहे. सुदैवाने अशी वेळ महाराष्ट्रावर अजूनही आलेली नाही, असे ऊर्जामंत्री डाॅ.नितीन राऊत म्हणाले.
डाॅ.राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. उपलब्ध विजेचे वितरण कार्यक्षम होण्यासाठी दक्षता बाळगणे, विजेची चोरी थांबविणे, अतिभारित विद्युत वाहिन्या व रोहित्रांवर तातडीने उपाययोजना कराव्यात, या बाबींमुळे लोडशेडिंग होणार नाही, यासाठी सक्त ताकीद डाॅ.राऊत यांनी दिली. मंत्रिमंडळाने टाटाच्या गुजरातमधील वीजनिर्मिती प्रकल्पातून ७६० मेगावॅट वीज विकत घेण्यासाठी मान्यता दिलेली आहे. ही अधिकची वीज येत्या आठवडाभरामध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे. तेव्हा सध्या जे विजेचे भारनियमन होत आहे, त्याला आळा बसेल. जनतेचे शंकानिरसन व्हावे, यासाठी २४ तास चालेल, अशा नियंत्रण कक्षाची स्थापना करावी, ज्यामुळे जनतेला योग्य खरी माहिती मिळेल व गैरसमज पसरणार नाही, असे डाॅ.राऊत म्हणाले.
विजेची चोरी करू नका
नागरिकांनी विजेचा वापर अत्यंत काटकसरीने करावा. वेळेवर वीजबिल भराव आणि विजेची चोरी करू नये, असे आवाहन डाॅ.राऊत यांनी केले.