'कमळ नाही तर बाण'; अखेर अब्दुल सत्तार यांचा शिवसेनेत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 12:48 PM2019-09-02T12:48:22+5:302019-09-02T13:07:50+5:30
भाजपच्या टोलवा-टोलवीला कंटाळून सत्तार शिवबंधनात
औरंगाबाद : सिल्लोडचे आ.अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसशी फारकत घेतल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच त्यांनी सोमवारी शिवसेनेत प्रवेश केला. सत्तार यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले. रविवारी सायंकाळीच ते तातडीने विमानाने मुंबईला रवाना झाले होते. यावरून सत्तार यांच्या भाजप सोडून शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.
कमळाबाई घाले डोळा, सत्तारांना लागला लळा
लोकसभा निवडणुकीपासून आ.सत्तार यांना भाजपमध्ये प्रवेश घ्यायचा आहे. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून दोन वेळा मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. परंतु त्यांचा भाजप प्रवेश अनिश्चित राहिला. महाजनादेश यात्रेत तरी मुख्यमंत्री आपल्याला भाजपात प्रवेश देण्याबाबत निर्णय घेतील, असे आ. सत्तार यांना वाटले होते. परंतु सत्तार यांना फक्त यात्रेतील रथात मुख्यमंत्र्यांसोबत उभे राहण्याची संधी मिळाली. सिल्लोड भाजपचा सत्तार यांना कडाडून असलेला विरोधच त्यांच्या प्रवेशाच्या आड येत असल्याचे कळते. दरम्यान, या टोलवा-टोलवीला कंटाळून सत्तार यांनी शिवबंधन बांधण्याचे निश्चित केले.
सिल्लोडची जबाबदारी सत्तार यांच्याकडे
मनात एक आणि ओठावर एक अस करणारा हा माणूस नाही. सिल्लोड मतदारसंघ पुन्हा निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकत असल्याचे यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.
संकटाच्या काळात शिवसेना शेतकऱ्यांसोबत
दुष्काळ, कर्जमाफी,नापिकी आदी समस्या सोडविण्यासाठी शिवसेना कायम शेतकऱ्यांसोबत राहिली. शेतकऱ्यांच्या संकटाच्या काळात सत्तेची पर्वा न करता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मोठे काम केले असल्याचे सत्तार यांनी पक्ष प्रवेशावेळी सांगितले.
तनवाणी यांच्या नावाचीही चर्चा
आ.सत्तार आणि माजी आ.किशनचंद तनवाणी हे शिवबंधनात अडकणार असल्याची चर्चा रविवारी दिवसभर होती. भाजपचे शहराध्यक्ष तथा माजी आ.तनवाणी म्हणाले, मी औरंगाबादेतच आहे. माझ्या नावाने चुकीची माहिती पसरविली जात आहे.महाजनादेश यात्रा व सभेचे नियोजन मध्य मतदारसंघात केले. इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचे नियोजन माझ्याकडेच होते. मुख्यमंत्र्यांनी स्वत: मला यात्रेत रथामध्ये बसण्यासाठी बोलावून घेतले. हे सगळे होत असताना मी भाजपतून कसा जाणार. आता माझा पक्ष भाजपच आहे व मी येथेच राहणार आहे.