एक दोन नव्हे, तब्बल १४ कोटी झाडांनी बहरणार समृद्धी महामार्ग
By विकास राऊत | Published: December 11, 2023 12:31 PM2023-12-11T12:31:35+5:302023-12-11T12:35:02+5:30
वर्षभरात ३० टक्के झाडे जळाली; वृक्षारोपणासाठी ७०० कोटींचा होणार खर्च
छत्रपती संभाजीनगर : मुंबई ते नागपूरपर्यंत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या दुतर्फा १४ कोटी वृक्षांनी बहरणार आहे. यासाठी ७०० काेटी रुपयांचा खर्च होणार असून, एक वर्षापासून हे काम सुरू झाले आहे. आजवर लागवड केलेल्या झाडांपैकी ३० टक्के झाडे जळाली असून, तेथे पुन्हा नव्याने झाडे लावण्यात येतील, असा दावा सूत्रांनी केला. एक किलोमीटरच्या अंतरात सुमारे २ लाख झाडे लावण्याचे नियोजन आहे.
७२० किमीचा हा मार्ग आहे.
समृद्धीचे भूसंपादन करतांना लाखो झाडे गेली. त्या मोबदल्यात राज्य रस्ते विकास महामंडळाने महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी झाडे लावण्यास सुरुवात केली आहे. एका झाडासाठी महामंडळाचे ५० रुपये खर्च होत आहेत. लावण्यात येत असलेली झाडे पाच वर्षांत मोठी होणे शक्य आहे. भविष्यात ७०० किलोमीटर लांब आणि दोन्ही बाजूंनी ३५ मीटर रुंदीचा हरित पट्टा हिरवाईने नटलेला दिसेल.
जिल्ह्यात २ कोटी ४० लाख झाडे लावणार
समृद्धीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून १२० किमी अंतर आहे. १ किमीमध्ये २ लाख झाडे याप्रमाणे २ कोटी ४० लाख झाडे लावण्यात येणार आहेत. यातील काही अंतरात झाडे लावण्यात आली आहेत. यात वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, जांभूळ, करंज, शमी, बेल या देशी झाडांचा समावेश असेल.
लोकार्पणानंतर अपघातामुळे चर्चेत
डिसेंबर २०२२ मध्ये समृद्धीचे लोकार्पण करण्यात आले. दुसऱ्या टप्प्याचे मे २०२३ मध्ये लोकार्पण झाले. समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ किमीचे लोकार्पण होऊन ११ महिने, तर दुसऱ्या टप्प्यातील ८० किमी मार्गाचे लोकार्पण होऊन सात महिने झाले आहेत. या ११ महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८५ अपघात झाले असून, त्यात १२५ जणांचा बळी गेला आहे.
३० टक्के झाडे जळाली
जिल्ह्याच्या हद्दीत आजवर लावलेली ३० टक्के झाडे जळाली आहेत. तेथे पुन्हा वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाच वर्षे होईपर्यंत ठेकेदारांची ठराविक रक्कम एमएसआरडीसीकडे राखीव असणार आहे.
‘रोड हिप्नॉटिझम’ वर कृत्रिम उपाय
जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर सध्या नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांच्या सजावटीचे काम सुरू आहे. महामार्गाच्या ‘रोड हिप्नॉटिझम’ ला ब्रेक लावण्यासाठी हा कृत्रिम उपाय महामंडळाने हाती घेतला आहे. नैसर्गिक झाडांची हिरवळ तत्काळ मोठी होणे शक्य नसल्यामुळे या कृत्रिम पर्यायाचे काम सुरू आहे.