केवळ दारू मुळेच नव्हे तर तब्बल ३०० कारणांनी यकृत होते खराब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 05:53 PM2018-05-21T17:53:21+5:302018-05-21T17:56:44+5:30
केवळ दारूमुळे यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये गैरसमज आहे; परंतु एक नव्हे तब्बल ३०० कारणांनी यकृत खराब होते.
औरंगाबाद : केवळ दारूमुळे यकृत खराब होते, असा नागरिकांमध्ये गैरसमज आहे; परंतु एक नव्हे तब्बल ३०० कारणांनी यकृत खराब होते. विशेष म्हणजे ८० टक्के यकृत खराब झाल्यानंतर लक्षणे दिसतात. त्यानंतरही आधुनिक वैद्यकीय सुविधांमुळे उपचार शक्य आहे. यकृत प्रत्यारोपणाचाही पर्याय आहे; परंतु अवयवदानाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे यकृत मिळण्याच्या प्रतीक्षेतच अनेकांचा मृत्यू ओढावतो, अशी चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली.
फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबाद आणि कमलनयन बजाज रुग्णालयातर्फे रविवारी (दि.२०) यकृताचे आजार, निदान आणि उपचारासंबंधी एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मुंबई येथील डॉ. समीर शाह, डॉ. आकाश शुक्ला, डॉ. वैशाली सोलाव, डॉ. अनुराग श्रीमाल, डॉ. सचिन पळणीटकर, फिजिशियन्स असोसिएशन आॅफ औरंगाबादचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, आयोजन सचिव डॉ. वैभव गंजेवार आदी उपस्थित होते.
डॉ. आकाश शुक्ला म्हणाले, हिपेटायटिस बी, हिपेटायटिस सी, आनुवंशिक आजार अशा अनेक कारणांनी यकृत खराब होते; परंतु वेळीच निदान आणि उपचाराने यकृत चांगले राहू शकते. अन्यथा यकृत प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नसतो. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादला यकृत प्रत्यारोपण शक्य झाले असून, वर्षाला जवळपास तीनशे प्रत्यारोपण होतात. वर्षाला सातशेपेक्षा अधिक लोकांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असते. गरजूंची संख्या अधिक ५५ वर्षे वयापर्यंतचा व्यक्ती गरजूला यकृतदान करू शकतो. यामध्ये यकृताचा काही भाग दिला जातो. दात्याचे यकृत काही दिवसांनंतर पूर्वीप्रमाणे होते, तर गरजूला जीवदान मिळते, असे ते म्हणाले.
डॉ. समीर शाह म्हणाले, कावीळच्या विषाणूंमुळे यकृत खराब होऊ शकते. यकृतास सूज आली तर त्याचे कारण शोधले पाहिजे. आरोग्यदायी आयुष्य, मद्यपान टाळणे, मधुमेह, रक्तदाब कमी करणे हे यकृत सुदृढ राहण्यासाठी महत्त्वाचे आहे. डॉ. अनुराग श्रीमाल म्हणाले, यकृत खराब झालेल्यांसाठी अवयवदान जीवनदान ठरते; परंतु गरजंूची संख्या अधिक आहे. त्यामुळे यकृताच्या प्रतीक्षेतच अनेकांचा मृत्यू होतो. अवयवदान वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. परिसंवादास मराठवाड्यातून
मोठ्या संख्येने तज्ज्ञांची उपस्थिती होती.