उतारवयातच नाही, लहान मुलालाही पक्षाघाताचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:46 IST2024-12-30T12:45:49+5:302024-12-30T12:46:04+5:30
पक्षाघात ही स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराचा एक किंवा अधिक भाग हालचाल करणे अशक्य होतो.

उतारवयातच नाही, लहान मुलालाही पक्षाघाताचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष नको
छत्रपती संभाजीनगर : पक्षाघात फक्त वयस्क लोकांनाच होतो, असा सर्वसामान्यांचा समज आहे. मात्र, हा समज चुकीचा आहे. लहान मुलांनाही पक्षाघात होऊ शकतो. त्यामुळे मुलांमधील कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करता कामा नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला.
पक्षाघात म्हणजे काय?
पक्षाघात ही स्थिती आहे, ज्यामध्ये शरीराचा एक किंवा अधिक भाग हालचाल करणे अशक्य होतो. यामध्ये स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण नसते. याचे मुख्य कारण म्हणजे मज्जातंतू प्रणालीतील अडथळा किंवा नुकसान. पक्षाघात तात्पुरता किंवा कायम स्वरूपी असू शकतो. पक्षाघात हे मृत्यू आणि अपंगत्वाचे एक महत्त्वपूर्ण कारण आहे.
पक्षाघात कशामुळे येतो?
मेंदूच्या रक्ताभिसरणामध्ये अचानक उद्भवलेल्या बदलांमुळे पक्षाघात होतो. त्यामध्ये कधी रक्तवाहिन्या बंद पडतात तर कधी फुटून रक्तस्राव होतो. अत्यंत तीव्र इन्फेक्शन, जखमा किंवा अपघात, मज्जारज्जू (स्पायनल कॉर्ड) किंवा डोक्याला इजा. आनुवंशिक आजार आदींमुळे पक्षाघात होऊ शकतो.
बचावासाठी काय कराल?
स्ट्रोकपासून बचावासाठी सात्विक अन्न, नियमित व्यायाम आणि धूम्रपानासारख्या हानिकारक सवयींपासून दूर राहण्याची स्वास्थ्यपूर्ण जीवनशैली अंगीकारणे आवश्यक आहे. ज्यांना उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आहे त्यांनी योग्य वैद्यकीय उपचाराद्वारे या स्थितींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
तपासण्या कोणत्या?
पक्षाघाताची शंका असल्यास मेंदू आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांची छायाचित्रे घेण्यासाठी सीटी स्कॅन किंवा एमआरआयची आवश्यकता असते.
लहान मुलांचे प्रमाण ५ टक्के
लहान मुलांमध्येही पक्षाघात पाहायला मिळतो. पक्षाघाताचे १०० रुग्ण असतील तर त्यात लहान मुलांचे प्रमाण हे ५ ते ६ टक्के असते. लहान मुलांमध्ये जेनेटिक डिसिजमुळे पक्षाघात होतो. लहान मुलांना काहीच होत नाही, असे समजू नये. लहान मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसली तर वेळीच वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे.
- डाॅ. इस्तियाक अन्सारी, न्यूरो सर्जन
उच्च रक्तदाब, मधुमेहाने धोका
उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि उच्च कोलेस्ट्रॉल यासारख्या आधुनिक जीवनशैलीच्या रोगांमुळे स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. मेंदूच्या टीबीसारख्या काही संसर्गामुळे पक्षाघात होऊ शकतो. ‘सेरेब्रोव्हास्क्युलर ऑक्सिडेंट’ हा शब्द स्ट्रोकच्या आकस्मिक, अपघाती स्वरूपाचे लक्षण दर्शवतो. जरी सर्व अपघात टाळता येत नसतात. परंतु योग्य पावले उचलून बरेच अपघात टाळता येऊ शकतात किंवा त्यापासून होणारी हानी कमी करता येते.
- डाॅ. मकरंद कांजाळकर, न्यूरोफिजिशियन