थंडी-वाऱ्यानेच नव्हे, तर उष्णतेनेही होते सर्दी! लक्षणांकडे दुर्लक्ष नको
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 07:40 PM2024-07-29T19:40:25+5:302024-07-29T19:42:09+5:30
उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय ?
छत्रपती संभाजीनगर : पावसामुळे किंवा थंडी-वाऱ्यामुळे अनेकांना सर्दी होते. काहींना पाण्यात बदल झाला तरी सर्दी होते; तथापि, सर्दीचा आणखी एक प्रकार म्हणजे उष्णतेने होणारी सर्दी. अनेकांना या त्रासाला सामोरे जावे लागते, असे तज्ज्ञांनी सांगितले.
सर्दी कशामुळे होऊ शकते?
पावसात भिजल्यास : पावसात भिजल्यावर केस आणि अंग कोरडे केले आणि भिजलेले कपडे लगेच बदलले पाहिजे. नाहीतर सर्दी होऊ शकते.
व्हायरल इन्फेक्शन : व्हायरल इन्फेक्शनमुळेही सर्दी, खोकल्याला सामोरे जावे लागते.
उष्णता : उष्णताही सर्दी आणि फ्लूचे कारण विषाणू (व्हायरस) आहे. जसजसे हवामान गरम होते तसतसे काही विषाणू सक्रिय होतात जे आजारी बनवितात.
एसीचा वापर : बाहेरून घरी, कार्यालयात येताच अनेकजण एसी लावतात. या सवयीनेही सर्दी होण्यास हातभार लागतो.
पित्त वाढल्यास होते सर्दी : पित्त वाढल्यानंतरही अनेकांना सर्दीचा त्रास उद्भवतो.
उष्णतेच्या सर्दीवर उपाय काय ?
बाहेरून घरी, कार्यालयात येताच एसी किंवा कुलर सुरू करणे, तर एसी रूममधून बाहेर पडून उन्हात जाणे, घरात येताच अंघोळ करणे, या गोष्टी टाळाव्या. भरपूर पाणी आणि इतर द्रव प्यावे. दररोज कमीत कमी ८ -१० ग्लास पाणी पिण्याचे लक्ष्य ठेवा आणि अल्कोहोल आणि कॅफिन टाळा, ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. आजारांपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. दररोज कमीतकमी सात-आठ तास झोपावे.
लक्षणांकडे दुर्लक्ष नको
सध्या ताप, पोटदुखी, गळादुखी, डेंग्यूसदृश रुग्ण वाढले आहेत. मूल जर गळाले असेल, झोपून राहात असेल तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. बाहेरचे पाणी, अन्नपदार्थ टाळावे.
- डाॅ. अभय जैन, बालरोगतज्ज्ञ.