मकबराच नव्हे, तर परिसराच्या दुर्दशेचे दशावतार...
By Admin | Published: July 8, 2017 01:19 PM2017-07-08T13:19:03+5:302017-07-08T13:37:33+5:30
जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू बीबी का मकबºयाच्या दुर्दशेचे दशावतार पाहून नागरिक नि:शब्दच होतात. मकबºयाचे अभिजात सौंदर्य लयास जात असतानाच तीच गत मकबरा परिसराची आहे.
> ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद : जगप्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू बीबी का मकबच्या दुर्दशेचे दशावतार पाहून नागरिक नि:शब्दच होतात. मकबऱ्याचे अभिजात सौंदर्य लयास जात असतानाच तीच गत मकबरा परिसराची आहे.
केवळ मुख्य इमारतच नाही, तर परिसरातील चारही बाजूंना असणाऱ्या चार इमारती, बागांमधून गेलेल्या विटा आच्छादित पायवाटा, कारंजे, जलवाहिन्या, भूमिगत जलमार्ग, जाळीयुक्त भिंती, त्यावरील नक्षीकाम, कारंजे, अशा अनेक छोट्या-मोठ्या मन मोहून टाकणाऱ्या गोष्टींच्या दुरवस्थेचे वर्णन करणे अवघड आहे. अशा ‘बेताज’ होऊ पाहणाऱ्या मकबऱ्याला आता केवळ जागरूक नागरिक, इतिहासप्रेमी पर्यटकांची साद अपेक्षित आहे.
मकबऱ्याच्या पूर्वेला आयना महल, पश्चिमेला मशीद, उत्तरेला बारादरी आणि दक्षिणेला मुख्य प्रवेशाची दोन मजली इमारत आहे. दक्षिणेकडून मकबऱ्यात प्रवेश करताच समोर ४८८ फुटांचा लांब, ९६ फूट रुंद आणि ३ फूट खोल हौद दिसतो. चार इमारती आणि मकबरा यामध्ये लांब हौद आहेत. या हौदात ६१ कारंजे आहेत. अनेक वर्षांपासून कारंजे तर बंद आहेच; पण आता त्यापैकी अनेक कारंजांची तुटफूटही झाली आहे.
लांब हौदाच्या काठांवरील भिंतींवर कलाकुसरीचे कोरीव काम केलेले आहे. इतिहासाच्या अभ्यासक डॉ. दुलारी कुरेशी यांनी सांगितले की, खास आग्रा येथून आणलेल्या लाल व काळ्या दगड्यांनी या भिंती बांधण्यात आल्या. चुन्याच्या मिश्रणाच्या गिलाव्याचा त्यावर थर देऊन विविध नक्षी कोरण्यात आल्या आहेत. भिंतीवरील या वैशिष्ट्यपूर्ण सजावटीची आता पुरती झीज झाली आहे.
मुघल स्थापत्य शैलीनुसार मकबऱ्याची रचना चार बाग पद्धतीने करण्यात आली. उत्तर-दक्षिण दिशेला ४५८ मीटर लांब आणि पूर्व-पश्चिम दिशेला २७५ मीटर रुंद एवढ्या विशाल जागेवर मकबºयाच्या चारही बाजूंनी चार उद्याने आहेत. मुघल सौंदर्यशास्त्रात बागेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. चार बागांच्या केंद्रस्थानी मकबऱ्याची मूळ इमारत उभी आहे. इतिहास अभ्यासक डॉ. रफत कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भूमितीय आकाराच्या चार बाग पद्धतींच्या मुघल बागांचे ले-आऊट हे इराण आणि तुर्कस्थानमध्ये विकसित करण्यात आले होते. यामध्ये एक मोठ्या चौकोनी जागेत चार समान बागांची निर्मिती करण्यात येते.
या बागांमधून जाणाऱ्या पाऊल वाटांवरील विटा अनेक ठिकाणी तुटल्या किंवा जीर्ण झाल्या आहेत. पर्यटकांची वर्दळ आणि वातावरणाचा मारा यामुळे विटांची झीज होणे स्वाभाविक आहे. मात्र, त्यावर त्वरित काही तरी उपाय करणे गरजेचे आहे. संपूर्ण मकबरा परिसराला संरक्षक भिंतीचे तट असून, त्यांचीही अवस्था बिकट आहे. प्रवेश करतो ती बाजू सोडली, तर इतर बाजूंनी अस्वच्छता, कचरा, पाण्याची डबकी साचलेली असतात. एवढ्या सुंदर वास्तूची या दुर्गंधीच्या कुंपणाने कुचेष्टाच चालविली आहे.
मकबऱ्याचे पाणी आटले
मकबऱ्याच्या विशाल उद्यानांसाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते. त्यासाठी अनेक जलवाहिन्या आणि भूमिगत जलमार्गांच्या माध्यमातून विविध ठिकाणांहून पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. बेगमपुऱ्यातील नहर मकबऱ्याचा जलस्रोत होता; परंतु आज हे पाण्याचे जाळे पूर्णपणे विस्कळीत होऊन बंदच पडले आहे. आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने मकबºयाच्या जलवाहिन्या फोडण्यात आल्या. ऐतिहासिक वास्तूंकडे गांभीर्याने पाहण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे नाही, अशी खंत डॉ. कुरेशी यांनी बोलून दाखविली.
बेशिस्त पर्यटक
दरवर्षी लाखो पर्यटक मकबऱ्याला भेट देतात; परंतु काही बेशिस्त पर्यटकांकडून मकबऱ्याचे विद्रुपीकरण केले जाते. येथील भिंतींवर नावे कोरून ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्याला बाधा आणली जाते. अशा विद्रुपीकरणाला आळा बसलाच पाहिजे. तसेच लोकांनी या जागेचे महत्त्व समजून घेऊन स्वत:देखील काळजी घेतली पाहिजे.