समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 11:51 AM2018-09-04T11:51:09+5:302018-09-04T11:51:52+5:30

समांतर हा प्रकल्प नसून निव्वळ लबाडी आहे. येणाऱ्या २० वर्षांमध्ये कंपनी तब्बल २ हजार कोटी रुपये कमविणार आहे. त्यातील १ हजार कोटी हा निव्वळ नफा आहे.

Not a parallel, this is a cheating project | समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प

समांतर नव्हे, हा तर लबाडीचा प्रकल्प

googlenewsNext

औैरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या वादग्रस्त कंपनीला पुन्हा एकदा आणण्याचे जोरदार प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी आणि त्यांचे नेते करीत आहेत. समांतर हा प्रकल्प नसून निव्वळ लबाडी आहे. येणाऱ्या २० वर्षांमध्ये कंपनी तब्बल २ हजार कोटी रुपये कमविणार आहे. त्यातील १ हजार कोटी हा निव्वळ नफा आहे. हा सर्व पैसा शहरातील सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून ओढण्यात येणार आहे. औरंगाबादकरांनी संपूर्ण ताकदीने या प्रकल्पाला विरोध केला पाहिजे, असे आवाहन समांतरविरोधी कृती समितीचे अध्यक्ष प्रा. विजय दिवाण यांनी केले.

नागेश्वरवाडी येथील स्वामी रामानंद तीर्थ सभागृहात एका छोटेखानी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर एस.आर. ठोलिये, आनंद आचार्य, अ‍ॅड. प्रदीप देशमुख, विजय शिरसाठ, दाते पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. दिवाण यांनी नमूद केले की, या देशात कोणत्याच शहरात पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये नाही. मुंबईत दररोज २४ तास पाणी असताना फक्त १२०० रुपये पाणीपट्टी आहे. पुण्यात १४०० रुपये, नाशिकमध्ये दररोज पाणी मिळते तरी पाणीपट्टी १२०० रुपये आहे. ४ हजार रुपये देऊनही औरंगाबादकरांना चौथ्या दिवशी पाणी मिळते. कोट्यवधी रुपयांचा नफा कमविण्यासाठी येणारी एसपीएमएल या कंपनीची हकालपट्टी करण्यात आली.

पुन्हा याच कंपनीला काम देण्यामागे हेतू काय आहे? कंपनी येणाऱ्या २० वर्षांमध्ये २ हजार कोटी रुपये मिळविणार आहे. त्यातील एक हजार कोटी निव्वळ नफा आहे. या नफ्यातील वाटेकरी अनेक आहेत. मनपातील सत्ताधारी, त्यांच्या नेत्यांनाच ही कंपनी हवी आहे. समांतर जलवाहिनी प्रकल्प म्हणजे औरंगाबादकरांसोबत करण्यात येणारी लबाडी आहे. शहरावर प्रचंड अन्याय होत असताना सर्वसामान्य नागरिक विरोध करण्यासाठी पुढे येण्यास तयार नाहीत, याचेच आपल्याला आश्चर्य वाटते, असेही त्यांनी नमूद केले. अ‍ॅड. देशमुख यांनी नमूद केले की, कंपनी शहरात नकोच आहे. महापालिकेने स्वत:हून जायकवाडीहून औरंगाबादपर्यंत जलवाहिनी टाकावी. अंतर्गत कामे नंतर हळूहळू करावीत.

आज धरणे आंदोलन
च्समांतर जलवाहिनीवर अंतिम निर्णय देण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे. समांतर जलवाहिनी विरोधी कृती समितीने मंगळवारी सकाळी १०.३० पासून मनपासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.

Web Title: Not a parallel, this is a cheating project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.