शिवशाहीचे नव्हे गुंडशाहीचे सरकार; रामदास कदम यांचा घरचा आहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 06:31 PM2018-04-20T18:31:31+5:302018-04-20T18:34:06+5:30
भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली.
औरंगाबाद : राज्यात सर्वत्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, भाजपच्या आमदारांना बलात्कार, खून, दरोड्यांच्या प्रकरणात अटक केली जात आहे. यामुळे हे शिवशाहीचे नव्हे तर गुंडशाहीचे सरकार असल्याची खरमरीत टीका राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर केली. २०१४ मध्ये जनतेला लॉलीपॉप दाखवून सत्ता हस्तगत केली. मात्र, आता मोदी लाट ओसरली असून, भाजपची उलटगिनती सुरू झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील आठ आणि सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी दोन अशा एकूण १२ लोकसभा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा औरंगाबादेतील सुभेदारी विश्रामगृहात घेतला. पहिल्या दिवशी मराठवाडा पूर्ण केल्यानंतर शुक्रवारी नगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाजपवर कडवट टीका केली.
भाजपचा खरा चेहरा समोर आला
भाजपचे आमदार खून, बलात्कारांच्या आरोपात अटक होत आहेत. समाजातील नामचीन गुंडांना पक्षात आणून भाजपने आमदार, खासदार बनवले असल्यामुळे दुसरे काय घडणार, असा सवालही कदम यांनी केला. भाजपचा खरा चेहरा समाजासमोर उघडा पडला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारनेही कधी सुडाचे राजकारण केले नाही. मात्र, त्यास भाजप अपवाद आहे. शिवसेनेतील काही नेत्यांना पदाची, पैशाची लालूच दाखवून फोडण्याचे घाणेरडे राजकारणही भाजपने खेळले आहे. याची किंमत भाजपला चुकवावीच लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचा खरा चेहरा समोर आल्यामुळे जनतेला शिवसेनेकडून सर्वांधिक अपेक्षा आहेत. या आपेक्षा पूर्ण करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख आणि पदाधिकारी रात्रंदिवस मेहनत घेण्यास तयार असल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेचे लक्ष विचलित करण्याचा डाव
शिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत एक हजार एक टक्के युती होणार नाही. सध्या भाजपवाले युती होणारच म्हणून शिवसेना पदाधिकाऱ्यांचे लक्ष विचलित करण्याची चाल खेळत आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढली तर दोन आकडी संख्याही गाठता येणार नाही. यात शिवसेनेचे कोणतेही नुकसान नाही. संभाव्य लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या नुकसानीमुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकायला सुरुवात झाल्याचेही कदम यांनी स्पष्ट केले. युती होणार नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचा फायदा होईल, हा दावाही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.