एकगठ्ठा मतदानाचे ‘कवतिक’ नाही!
By Admin | Published: September 25, 2014 12:57 AM2014-09-25T00:57:19+5:302014-09-25T00:58:22+5:30
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या विसंवादाचे प्रतिबिंब साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या विसंवादाचे प्रतिबिंब साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे मसापच्या एकगठ्ठा मतांचे यंदा ‘कवतिक’ उरले नाही, अशी चर्चा साहित्य वर्तुळात रंगली आहे.
मुळातच ‘उस्मानाबाद’चा घास हिरावून घेऊन ‘घुमान’च्या मुखात घातला गेल्याने मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील नाराज आहेत. याची परिणती सोमवारी पाहण्यास मिळाली. डॉ. सदानंद मोरे यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचविणारा अर्ज स्वीकारण्यास प्रकृती अस्वास्थ्यामुळे ठाले पाटील उपस्थित नव्हते. मात्र, ही प्रक्रिया संपल्यावर मसापमध्ये ठाले पाटील यांचे आगमन झाले व ते थेट आपल्या कार्यालयाकडे निघून गेले. नियोजित संमेलनाध्यक्ष हा मराठवाड्याच्या भूमीतील असावा, अशी उघड भूमिका ठाले पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे ठाले पाटील यांचा पाठिंबा कोणाला हे आता उघड गुपित झाले आहे.
घुमान येथे संमेलन होत असताना अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक हे संमेलनाचे अध्यक्ष असावेत, अशी अपेक्षा प्रदर्शित करीत कोषाध्यक्ष डॉ. दादा गोरे यांनी मोरे यांची पाठराखण केली आहे. तर मतदार सुज्ञ असून ते योग्य उमेदवाराला निवडून देतील, अशी ‘नरो वा कुंजरो वा’ भूमिका कुंडलिक अतकरे यांनी घेतली आहे. या तीन प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भूमिकांमधील विसंवाद लक्षात घेता संमेलनाध्यक्षपदासाठी कोणत्याही उमेदवाराला एकगठ्ठा मतदान होणार नसल्याची बाब अधोरेखित होत आहे. संमेलनाध्यक्ष निवडून देण्याच्या यादीमध्ये मतदाराचे ई-मेल अॅडे्रस आणि मोबाईल क्रमांकासह पूर्ण यादी देण्यामध्ये मसाप अपयशी ठरली आहे. त्यामुळे साहित्य महामंडळाने यंदा केवळ नाव व पत्ता असलेली यादीच प्रसिद्ध केली आहे. या त्रुटींमुळे एकीकडे मतदारांपर्यंत पोहोचण्यात उमेदवारांची अडचण होत असून, ही बाब ध्यानात घेऊन भारत सासणे यांच्या प्रचारासाठी एका माजी संमेलनाध्यक्षांनीच कंबर कसली आहे. हे माजी संमेलनाध्यक्षही मराठवाड्यातील असल्याने यंदा मसापमधील मतदारांमध्येही फूट पडणार हे निश्चित.