दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 07:59 PM2024-08-23T19:59:01+5:302024-08-23T19:59:45+5:30
सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर : शहरात इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या वाढू लागली आहे. ही वाहने चार्ज करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी मनपाने २०० चार्जिंग स्टेशन उभारण्याची घोषणा केली होती. आता ही संख्या अवघ्या आठवर आली आहे. बुधवारी प्रशासनाने दोन खासगी कंपन्यांसोबत चार्जिंग स्टेशन उभारण्यासंदर्भात चर्चा केली. मनपाच्या कोणत्या जागांवर चार्जिंग स्टेशन उभारता येतील, याची चाचपणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर वाहन धोरणाला शासनानेही पाठिंबा दर्शविला. भविष्यात अधिकाऱ्यांसाठीही ई-वाहने खरेदी करण्याचे धोरण ठरले. महापालिकेनेही पहिल्या टप्प्यात चार कार खरेदी केल्या. आता ई-वाहनेच खरेदी करावीत, असे ठरले. अलीकडेच मनपाने सर्व वाहने पेट्रोल-डिझेलची खरेदी केली. यातून शासनाच्या ई-धोरणाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू झाली.
एसी आणि डीसी पद्धतीचे स्टेशन उभारा
बुधवारी दोन खासगी कंपन्यांसोबत प्रशासनाने चर्चा केली. शासकीय कार्यालये, सार्वजनिक गर्दीची ठिकाणे, महापालिकेचे पेट्रोल पंप याठिकाणी चार्जिंग स्टेशन सुरू करण्यासंदर्भात आठ जागा निश्चित करून प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना केली. सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली.