वाळूमाफिया नव्हे; दहशतवादीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:05 AM2018-12-26T00:05:48+5:302018-12-26T00:06:17+5:30
तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती वाळू तस्करीची झाली आहे.
मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : तालुक्यात अवैध वाळू उपसा प्रकरण सातत्याने गाजत आहे. मात्र त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही. ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी स्थिती वाळू तस्करीची झाली आहे. जिवाचा थरकाप उडेल, इतकी वाळू माफियांची दहशत वैजापुरात दिवसेंदिवस वाढत आहे.
दोन दिवसांपूवीच म्हणजे रविवारी सायंकाळी नायब तहसीलदार रमेश भालेराव हे वाळू तस्करी रोखण्यासाठी शिवना नदी पात्रात गेले असता त्यांच्यावर वाळू माफियांसह शंभर ते सव्वाशे लोकांच्या जमावाने हल्ला करुन हुसकावण्याचा प्रकार घडला. यावरुन वाळू तस्करांची दादागिरी किती वाढली आहे, हे लक्षात येथे.
या प्रकरणी जवळपास सव्वाशे लोकांवर देवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महसूल पथकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ वैजापूर तालुक्यातील सर्व महसूल कर्मचाऱ्यांनी सोमवारी काम बंद आंदोलन केले.
त्यामुळे त्या दिवशी तालुक्यातील तहसीलसह सर्वच तलाठी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
संघटित गुन्हेगारी
तालुक्यात जमिनीच्या विक्रीप्रमाणेच, वाळू उत्खननाच्या बेकायदा आणि संघटित पद्धतीच्या व्यवसायाने हात-पाय पसरले आहेत. तेथे वाळू माफियांचा शिरकाव झपाट्याने झाला आहे. तरीही वाळू माफियांना पायबंद घालण्यासाठी महसूल यंत्रणा कमी पडते, हे कोणीही नाकारू शकत नाही. खरे तर, हे बेकायदा धंदे फोफावण्याची प्रमुख कारणे वरिष्ठ पातळीपर्यंतचा भ्रष्टाचार आणि राजकीय दबाव हीच आहेत. त्यामुळे हे सर्व प्रकार स्थानिक पातळीवर कसे रोखणार, हाही एक प्रश्नच आहे. कारण या साºया प्रकारांची पाळेमुळे थेट वरपर्यंत आहेत. महसूल यंत्रणा राजकीय दबावाखाली वावरत असल्यामुळे दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी वाढली आहे.
तालुक्यात दरवर्षी वाळू लिलावाकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने कोट्यवधींचा महसूल बुडत असल्याचे रडगाणे प्रशासनाकडून गायले जात असताना गोदावरी व शिवना नदीपात्रातून दररोज हजारो ब्रास चोरीच्या वाळूची वाहतूक सुरूच आहे. मात्र, महसूल विभागातील काही कर्मचारी स्वत:च्याच तुंबड्या भरण्यात मश्गूल असल्याने शासनाला कोट्यवधींच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. विशेष म्हणजे महसूल विभागातील अधिकाºयांनी त्यांची कामे करण्यासाठी कंत्राटी व काही खासगी कर्मचारी नेमले असून हे खासगी कर्मचारीच तहसीलची कामे सांभाळत असल्याचे चित्र आहे. हे अनधिकृत कर्मचारी अधिकाºयांचे व महसूल पथकातील सर्व काम सांभाळतात.
‘मलाई’दार धंद्यामुळे प्रशासनाचे ‘दुर्लक्ष’
या मुजोर तस्करांच्या मुसक्या आवळण्यात पोलीस व महसूल प्रशासनाला का यश येत नाही, हे मोठे कोडे आहे. तसे पाहिले तर या धंद्यात मोठी ‘मलाई’ असल्याने प्रशासनही ‘दुर्लक्ष’ करते, यामुळेच या तस्करांना अभय मिळत असल्याने त्यातूनच ही हल्ल्याची घटना घडली असावी, अशीही चर्चा होत आहे.