NoteForVote: ओळखपत्र ठेवा, लागलीच घ्या हजार; छत्रपती संभाजीनगरात दोघांना पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 11:14 IST2024-11-19T11:09:52+5:302024-11-19T11:14:45+5:30

आधार, मतदान ओळखपत्र ठेवून हजार दिले, मत दिल्यानंतर राहिलेले ५०० रुपये देण्याचे आश्वासन

NoteForVote: Keep ID, Get Thousand Instantly; tow were caught in Chhatrapati Sambhaji Nagar | NoteForVote: ओळखपत्र ठेवा, लागलीच घ्या हजार; छत्रपती संभाजीनगरात दोघांना पकडले

NoteForVote: ओळखपत्र ठेवा, लागलीच घ्या हजार; छत्रपती संभाजीनगरात दोघांना पकडले

छत्रपती संभाजीनगर : आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र ठेवून घेत मतदानासाठी १ हजार रुपये देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला जवाहरनगर पोलिसांनी पकडले. पश्चिम मतदारसंघातील इंदिरानगरमध्ये सोमवारी (दि. १८) ही कारवाई करण्यात आली. तो कोणत्या पक्षाच्या उमेदवारासाठी पैसे वाटत होता, ही माहिती रात्री उशिरापर्यंत समोर आली नव्हती. अशोक रामभाऊ वाकोडे (४२, रा. शंभूनगर) असे पैसे देणाऱ्याचे आणि नदीम पठाण (रा. इंदिरानगर) असे पैसे घेणाऱ्याचे नाव असल्याची माहिती जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक अशोक शरमाळे यांनी दिली.

पोलिस उपायुक्त नवनीत काँवत यांना एक व्हिडीओ आला होता. त्यात आरोपी अशोक वाकोडे हा इंदिरानगरमध्ये नदीम पठाणला १ हजार रुपये देऊन त्याचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आपल्याकडे ठेवून घेत असल्याचे समोर आले. या व्हिडीओची काँवत यांनी गंभीर दखल घेतली. त्यांनी हा व्हिडीओ तत्काळ जवाहरनगर ठाण्याचे निरीक्षक शरमाळे आणि एफएसटी पथकाचे सागर गोरे यांना पाठविला. त्यांनी इंदिरानगरात धाव घेतली. तेव्हा आरोपी वाकोडे हा नदीमच्या घराजवळच बसलेला आढळला. पोलिसांनी त्याला पकडून ठाण्यात आणले.

आता एक हजार रुपये घेऊन आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आमच्याकडे ठेवायचे. मतदानानंतर आधार कार्ड आणि ओळखपत्र परत करून पुन्हा ५०० रुपये द्यायचे, अशी त्याची पद्धत असल्याचे चौकशीत समोर आले. वाकोडेने १ हजार रुपये दिल्याचे आणि पठाणने १ हजार रुपये घेतल्याचे कबूल केल्याचेही शरमाळे यांनी सांगितले. त्याने यापूर्वी किती मतदारांना पैसे वाटले? त्याच्याकडे आणखी काही मतदारांचे आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र आहे का? याची चौकशी पोलिस करीत आहेत.

Web Title: NoteForVote: Keep ID, Get Thousand Instantly; tow were caught in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.