‘सर्वसामान्यांच्या जिवापेक्षा काहीच मोठे नाही’; मनपा-पोलीस संयुक्त कारवाईत बायपासवरील अतिक्रमणांवर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2019 08:11 PM2019-03-13T20:11:39+5:302019-03-13T20:17:47+5:30
सर्व्हिस रोडवरील बांधकामे अवैध ठरवून तोडण्यात आली. या कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
औरंगाबाद : पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी बीड बायपास रोडवर सर्व्हिस रोड तयार करण्याचे इंद्रधनुष्य सोमवारी उचलले. पोलीस आयुक्तांच्या या कारवाईला महापालिकेने मंगळवारीही चांगलेच बळ दिले. देवळाई चौकातील तब्बल २० पेक्षा अधिक पक्की दुकाने, शेड जमीनदोस्त करण्यात आले. कारवाई थांबविण्यासाठी नागरिक, व्यापारी, वकील मंडळींकडून वारंवार अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू होता. ‘सर्वसामान्यांच्या जिवापेक्षा काहीच मोठे नाही’ म्हणत मनपा अधिकाऱ्यांनीही कारवाईत सातत्य ठेवले. सर्व्हिस रोडवरील बांधकामे अवैध ठरवून तोडण्यात आली. या कारवाईमुळे सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे.
बीड बायपास म्हणजे मृत्यूचा सापळा, असे समीकरणच मागील काही वर्षांमध्ये बनले होते. आठवड्यातून दोन ते तीन निष्पाप नागरिकांना या रस्त्यावर जीव गमवावा लागत होता. बायपास रोडच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोडची तरतूद असतानाही महापालिकेने आजपर्यंत कारवाई केली नाही. उलट कारवाईच्या नावावर निव्वळ टाईमपास सुरू केला होता. शुक्रवारी आणि रविवारी दोन महिला बायपासवर वेगवेगळ्या अपघातात ठार झाल्या. त्यानंतरही महापालिका अधिकाऱ्यांनी ‘जमीर’(आत्मा) मेल्याप्रमाणे काहीच कारवाई केली नाही. या प्रकारामुळे चिडलेल्या पोलीस आयुक्तांनी सोमवारी बीड बायपासचा ताबा घेतला. सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी महापालिकेला कामाला लावले. पहिल्या दिवशी एमआयटी ते जबिंदा लॉनपर्यंत १५ अतिक्रमणे काढण्यात आली.
देवळाई चौक टार्गेट
बीड बायपास रोडवर देवळाई चौकात आजपर्यंत सर्वाधिक अपघात झाले आहेत. येथील चौक मोकळा करण्यासाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता कारवाईला सुरुवात करण्यात आली. मखसुद खान यांच्या मालकीची असंख्य दुकाने या चौकात होती. दुकानांमधील सामान काढण्यासाठी एक तासाचा अवधी देण्यात आला. सामान काढताच महापालिकेच्या जेसीबीने पक्की दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. दुपारी २ वाजेपर्यंत दहापेक्षा अधिक दुकाने पाडण्यात आली. त्यानंतर मनपाच्या पथकाने घरांसमोरील मोठ-मोठे वॉलकम्पाऊंड, दुकानांचे शेड पाडण्याची कारवाई केली. सायंकाळपर्यंत २० पेक्षा अधिक अतिक्रमणे काढली होती. दुकानांमधील सामान उचलून नेण्यासाठी व्यापाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. काही व्यापाऱ्यांना मनपाच्या कर्मचाऱ्यांनीही सामान भरण्यास मदत केली.
दुभाजकापासून शंभर फूट
बायपासवरील दुभाजकापासून दोन्ही बाजूंनी १०० फूट रस्ता मोकळा करण्यात येत आहे. महापालिकेने तीन वर्षांपूर्वी १०० फुटांच्या आत येणाऱ्या मालमत्तांवर मार्किंग करून ठेवली आहे. मंगळवारी कारवाई करताना हीच मार्किंग कामाला आली.
कच्चा रस्ता करणे सुरू
बायपासवर पाडापाडी करताच मनपाने मलबा उचलणे आणि सर्व्हिस रोडवर मुरूम टाकून कच्चा रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. युद्धपातळीवर रस्ता नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी सांगितले. एमआयटी चौक ते संग्रामनगर उड्डाण पुलापर्यंत एक किलोमीटर रस्ता मोकळा करण्यात आला आहे. या जागेचा तातडीने ताबा घेऊन कामही सुरू करण्यात आले. रस्त्यावर मुरूम टाकून तात्पुरती व्यवस्था केली जाणार असल्याचे काझी यांनी सांगितले. स्वामी विवेकानंद उद्यानात सध्या महापालिकेतर्फे खोदकाम सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मुरूम निघाला असून, तो मुरूम या रस्त्यावर टाकला जाणार आहे. त्यानंतर रोलर फिरविण्यात येणार आहे.
विजेचे पोल हटविणार
आचारसंहिता सुरू होताच बायपासवर सर्व्हिस रोड करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. त्यामुळे राजकीय मंडळींनी मोहिमेकडे पाठ फिरविली. मागील दोन दिवसांमध्ये सर्व्हिस रोड जेवढा मोकळा करण्यात आला तेथे विजेचे पोल, ठिकठिकाणी डी.पी. आहेत. योगायोगाने महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया यांच्याकडे मनपा आयुक्त पदाचा अतिरिक्त पदभार आहे. त्यांच्या कार्यकाळात सर्व विजेचे पोल, डी.पी. युद्धपातळीवर हटविण्याची कारवाई सुरू होणार आहे.
ग्रामपंचायतीचे परवाने
बायपासवर काही मालमत्ताधारकांनी आमच्याकडे बांधकाम परवानगी असल्याचा दावा केला. हे ऐकून मनपा अधिकारी क्षणभर स्तब्ध झाले. मालमत्ताधारकांनी खरोखरच ग्रामपंचायतीने दिलेली बांधकाम परवानगी दाखविली. ग्रामपंचायतीला बांधकाम परवानगी देण्याचे अधिकार नाहीत, असेही अधिकाऱ्यांनी मालमत्ताधारकांना सांगितले.
१६ किमीचा सर्व्हिस रोड तयार करणार
महानुभव आश्रम ते बाळापूरपर्यंत ८ किलोमीटर आणि बाळापूर ते महानुभव आश्रमपर्यंत ८ किलोमीटर सर्व्हिस रोड तयार करण्यात येणार असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.एकूण १६ कि.मी.मध्ये १४० मालमत्ता पाडाव्या लागणार आहेत. मुख्य रस्ता आणि सर्व्हिस रोड यामध्ये ग्रीन बेल्ट विकसित करण्याचा मानस आहे. सोमवारी १ किमी., तर मंगळवारी आणखी १ कि.मी.पर्यंतची अतिक्रमणे काढण्यात मनपा, पोलिसांना यश आले.
‘त्या’अतिक्रमणांना अभय
महापालिकेने मार्किंग केल्यानुसार बांधकामे स्वत:हून काढून घेण्याचा इशारा सोमवारीच पोलीस आयुक्तांनी दिला होता. मंगळवारी सायंकाळपर्यंत काही मोठी अतिक्रमणे जशास तशी होती. हिवाळे लॉन्सपासून संग्रामनगर उड्डाण पुलापर्यंत काही अतिक्रमणे तशीच आहेत. बुधवारी एमआयटी आणि मोठी अतिक्रमणे पाडण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
अन्न-पाणी नाही...
सकाळी १० वाजेपूर्वीच मनपा अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा बीड बायपासवर दाखल झाला होता. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही यावेळी ठेवण्यात आला होता. दिवसभर भर उन्हात कारवाई सुरू होती. पोलीस, मनपा अधिकारी अन्न-पाण्याविना कारवाईत मग्न होते. कारवाईचा आढावा घेण्यासाठी प्रभारी आयुक्त ओम प्रकाश बकोरिया येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, बकोरिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना ‘काम सुरळीत सुरू असेल तर कशाला यावे’ असा प्रश्न उपस्थित केला
पोलीस आयुक्तांची भेट
सायंकाळी ६.१५ वाजता पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी देवळाई चौक ते सूर्या लॉनपर्यंत पाहणी केली. महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख ए.बी. देशमुख, पदनिर्देशित अधिकारी प्रभाकर पाठक यांच्यासोबत चर्चा केली.