आमची कुळे काढून काही होणार नाही, जे शिल्लक आहेत, ते सांभाळा अन्यथा कुटुंबापुरतेच उराल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 12:40 PM2022-09-24T12:40:55+5:302022-09-24T12:42:26+5:30
उद्धव ठाकरेंवर आम्ही चार व आमच्या गटाचे चार अशी स्थिती येईल.
औरंगाबाद : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आगामी काळात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ पुरतेच मर्यादीत राहतील. आमची कुळे काढून काही होणार नाही. जे शिल्लक आहेत, ते सांभाळा नाहीतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांना कधी पळवतील, हे कळणार देखील नाही, असा ठाकरेंना चिमटा काढत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी जोरदार टीका केली.
येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, आमच्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सोबत त्यांना भावली. आता ठाकरेंना अंधारात पवारच दिवा दाखवित असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. या सगळ्या टीका-टिपणीत त्यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर दिलदार नेता असल्याची स्तुतिसुमने उधळली. प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रे १२ ऑगस्ट रोजी हाती घेतल्यानंतर बावनकुळे यांचा १५ वा जिल्हा दौरा औरंगाबादेत होता. दिवसभरात बैठका, रॅली, मेळावे, भेटी आदी भरगच्च कार्यक्रम त्यांच्या उपस्थितीत झाले.
पत्रकारांच्या अनेक प्रश्नांवर उत्तरे देताना बावनकुळे म्हणाले, ठाकरेंवर आम्ही चार व आमच्या गटाचे चार अशी स्थिती येईल. मुंबईत सध्या ठाकरे गटाकडे चार जणांचे फोटो दिसत आहेत. राज्य, विकासाबाबत बोलायचे सोडून त्यांना आता सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना अंधारमय जीवन दिसते आहे. समोर काळोख पसरला असून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार त्यांना दूरून दिवा दाखवित आहेत. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांवर टीका करीत आहेत. ते मुंबईत आले तर एवढा धसका कशासाठी घेतला. शहा आणि ठाकरे यांची तुलना म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्याप्रमाणे आहे. सध्या ते नैराश्येतून तोंडसुख घेत आहेत.
यावेळी सहकार मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, विक्रांत पाटील, बापू घडमोडे, राहुल लोणीकर, अनिल मकरिये, विजय औताडे उपस्थित होते.
राज ठाकरेंवर स्तुतिसुमने....
राज ठाकरेंशी वैयक्तिक मैत्री असून ते दिलदार नेते आहेत. त्यांच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, मात्र जे बोलणार ते करणार असा नेता आहे. बाकी लोकांसारखे त्यांचे नाही. राज यांच्यासोबत युतीवर बावनकुळे यांनी काहीही उत्तर दिले नाही. उद्धव ठाकरेंसोबत मैत्री सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला; परंतु राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सोबत त्यांना भावल्याने आमच्या सोबतची मैत्री सोडल्याचे ते म्हणाले.