प्राचार्यपद रद्द करण्यासाठी बदनापूर महाविद्यालयाला नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 11:22 PM2018-12-05T23:22:10+5:302018-12-05T23:22:48+5:30
बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्द करण्यासाठी बुधवारी (दि.५) नोटीस पाठविली आहे. या नोटिसीला १० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
औरंगाबाद : बदनापूर येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांचे बेकायदा निलंबन रद्द करण्याचे वारंवार आदेश देऊनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर यांचे पद रद्द करण्यासाठी बुधवारी (दि.५) नोटीस पाठविली आहे. या नोटिसीला १० डिसेंबरपर्यंत उत्तर द्यावे लागणार आहे.
विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत बामुक्टो संघटनेतर्फे निवडणूक लढविलेले डॉ. शरफोद्दीन शेख यांच्या निवडणूक अर्जावर उपप्राचार्य प्रा. महेश उंडेगावकर यांनी सही केली. यानंतर प्राचार्य डॉ. पाथ्रीकर यांनी महाविद्यालयाचे शिक्के व सही बोगस वापरल्याचा आरोप करून दोघांवर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, तसेच निलंबनही केले. याविरोधात दोघांनी जालना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करून घेत गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल केली. यात न्यायालयाने प्राध्यापकांची बाजू ग्राह्य धरून गुन्हे रद्द केले. यानंतरही महाविद्यालय प्रशासनाने प्राध्यापकांना रुजू करून घेतले नाही. संस्थेने डॉ. एम.डी. जहागीरदार यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली. ही समिती नियमबाह्य असल्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने समिती रद्द केली. याच कालावधीत उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक आणि विद्यापीठ प्रशासनाने दोन वेळा आदेश देऊन प्राध्यापकांना रुजू करून घेत संपूर्ण वेतन देण्याचे बजावले, तरीही प्राचार्यांची मनमानी कायम राहिल्यामुळे बामुक्टो संघटनेने प्राचार्यांची विद्यापीठ कायद्यातील कलम १३ (च)नुसार पद मान्यता रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे कुलगुरूंकडे केली. यानुसार विद्यापीठ प्रशासनाने बुधवारी (दि.५) प्राचार्यांना नोटीस पाठवली आहे. यात आपले पद रद्द का करण्यात येऊ नये, याचा खुलासा १० डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश दिले आहेत. यावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मेहेर दत्ता पाथ्रीकर कोणती भूमिका घेतात, याकडे विद्यापीठ वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
प्राध्यापकांवर विनाकारण अन्याय होता कामा नये. न्याय्य बाजू असतानाही निलंबन केले जात असेल, आदेश देऊनही रुजू केले जात नसेल, तर त्याविरोधात विद्यापीठ प्रशासन कडक भूमिका घेत प्राध्यापकांना न्याय देईल.
- डॉ. बी.ए. चोपडे, कुलगुरू