बड्या थकबाकीदारांना नोटीस
By Admin | Published: March 11, 2017 12:23 AM2017-03-11T00:23:40+5:302017-03-11T00:24:43+5:30
उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या बिगर शेतीच्या थकबाकीदारांविरूध्द कर्जवसुलीची मोहीम जिल्हा बँकेने पुन्हा हाती घेतली आहे़
उस्मानाबाद : जिल्हा बँकेच्या बिगर शेतीच्या थकबाकीदारांविरूध्द कर्जवसुलीची मोहीम जिल्हा बँकेने पुन्हा हाती घेतली आहे़ थकबाकीदारांना अंतिम नोटीस देऊन पाच दिवसांची मुदत देण्यात आली आहे़ मुदतीत कर्जभरणा न करणाऱ्या कर्जदारांच्या घरासमोरच ठिय्या मांडून गांधीगिरी पध्दतीने आंदोलन करण्यात येणार आहे़ दरम्यान, शुक्रवारी जिल्हा बँकेच्या ६० कर्मचाऱ्यांनी एकत्रित फिरून ९१० जणांना नोटिसा दिल्या आहेत़
रोखे घोटाळा, विनातारण कर्जवाटप, थकित कर्ज आदी विविध कारणांनी जिल्हा बँक अडचणीत आली आहे़ नाबार्ड आणि सहकार आयुक्तांच्या आदेशानुसार राज्यातील कमकुवत व आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या बँकांवर विभागीय सहनिबंधक अधिकाऱ्यांची सल्लागार समिती स्थापन करण्यात आली आहे़ जिल्हा बँकेची जबाबदारी असलेले लातूर येथील सहनिबंधक श्रीकांत देशमुख यांनी कर्जवसुलीसाठी बैठक घेऊन कर्जवसुली मोहीम सक्तीने राबविण्याच्या सूचना दिलेल्या आहेत़ कर्जवसुलीसाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक यु़एल़पवार यांना कर्ज वसुली मोहिमेवर दैनंदिन स्वरूपाचा आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ देशमुख यांच्या आदेशानुसार जिल्हा बँकेने बिगर शेती थकित कर्जदारांना नोटीसा देण्याची प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली आहे़ कारखाने वगळता इतर बिगर शेती कर्जदार संस्थांकडे जवळपास २२ कोटी रूपयांची थकबाकी आहे़ शुक्रवारी शहरासह परिसरातील ९१० थकित कर्जदारांना अंतिम नोटीस देण्यात आली आहे़ या नोटिसीत पाच दिवसात कर्जभरणा न केल्यास थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकारी, सदस्यांच्या घरासमोर गांधीगिरी करून ठिय्या मांडला जाणार असल्याचे ही नमूद केले आहे़ विशेष म्हणजे या आंदोलनात ठेवीदारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आल्याचे कार्यकारी संचालक विजय घोणसे-पाटील यांनी सांगितले़ दरम्यान, बँकेची ही आक्रमक भूमिका यापुढील काळातही कायम राहणार का, याकडे लक्ष लागले आहे.