कंत्राटदारांना मनपाकडून नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:44 AM2017-11-03T00:44:51+5:302017-11-03T00:44:56+5:30
कार्यारंभ आदेश देवूनही कामाला प्रारंभ न करणाºया कंत्राटदारांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात कामाला प्रारंभ करुन महिनाभरात कामे पूर्ण करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. कामे पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : कार्यारंभ आदेश देवूनही कामाला प्रारंभ न करणाºया कंत्राटदारांना महापालिकेने नोटीसा बजावल्या असून दोन दिवसात कामाला प्रारंभ करुन महिनाभरात कामे पूर्ण करण्याचेही आदेशित करण्यात आले आहे. कामे पूर्ण न केल्यास काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहरातील अनेक कामे सुरू करण्याचे आदेश महापालिकेने त्या त्या कंत्राटदारांना दिले होते. मात्र कार्यारंभ आदेश मिळूनही कामे सुरू झाली नसल्याची बाब महापालिकेच्या निदर्शनास आली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने सदरील कंत्राटदारांना ३० आॅक्टोबर रोजी नोटीस बजावल्या आहेत.
त्यामध्ये पाणी पुरवठा, मलनि:सारण योजना, रस्ते आदी कामांचा समावेश आहे. महापालिकेने नोटीसा दिलेल्या कंत्राटदारांमध्ये सोहेल कन्स्ट्रक्शन, मोईज पठाण, शिवाजी इंगळे, मे. प्रविण कन्स्ट्रक्शन, स्मीता पांढरे, अबचलनगर, इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारांचा समावेश आहे. पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता के.टी. शास्त्री आणि महापालिका बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गिरीष कदम यांनी या नोटीस बजावल्या आहेत. दोन दिवसात कामे सुरू करुन ती कामे २५ नोव्हेंबर तसेच ३० नोव्हेंबर २०१७ पर्यंत पूर्ण झाली पाहिजेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सदर कंत्राटदारांनी कामे पूर्ण न केल्यास त्यांच्याकडील कामे काढून घेताना त्यांना काळ्या यादीत टाकले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
महापालिका निवडणुकीनंतर प्रशासकीय कामकाजात गतीमानता आणण्याचे प्रयत्न आयुक्त गणेश देशमुख यांनी सुरू केले आहेत. त्यांनी स्वत: शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी करुन नागरिकांसाठी समस्या ठरलेले प्रश्न सोडविण्यास ते प्रयत्न सुरू केले आहेत. देशमुख यांनी स्वत: कामावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक कामे सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
असे असताना कार्यारंभ आदेश देवूनही कामे सुरू नसल्याचे उघड झाल्यानंतर कंत्राटदारांना नोटीसा बजावल्या आहेत. महापालिकेने पहिल्यांदाच कंत्राटदारांना कामासंदर्भात नोटीसा बजावल्या आहेत. या नोटीसा मिळाल्यानंतर तरी कंत्राटदार कामे सुरू करतील काय? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.