नोटीसधारकांची होतेय धावपळ
By Admin | Published: July 11, 2017 11:44 PM2017-07-11T23:44:09+5:302017-07-11T23:46:01+5:30
सेनगाव : तहसील कार्यालयाने शहरातील ५०० हून अधिक नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : तहसील कार्यालयाने शहरातील ५०० हून अधिक नागरिकांना अतिक्रमण काढण्याच्या नोटिसा बजावल्याने या कारवाईने शहरात खळबळ उडाली असून, नोटीसधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नोटिसांचा खुलासा करण्यासाठी जुने पुरावे गोळा करण्यासाठी मोठी धावपळ उडाली आहे.
येथील नगरपंचायत हद्दीत असणारा गट नं. ९५६ या जमिनीच्या क्षेत्रांची महसूल दप्तरी शासनाच्या नावाने नोंद आहे. या ४ हेक्टर ८५ आर जमिनीवर मागील ६० ते ७० वर्षांपासून जवळपास ३५० घरांचे इंदिरा नगर वसलेले आहे. त्याशिवाय शासकीय कार्यालये, नगरपंचायत, शाळा, आठवडी बाजार, नगरपंचायतीचे गाळेधारक आहेत. या सर्वांना तहसील कार्यालयाने ८ जुलै रोजी अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या असून, या गटात उभारलेली घरे, दुकाने यासंबंधी आठ दिवसांत जागेचे पुरावे सादर करण्याचे दिले आहेत. १५ जुलैनंतर अतिक्रमणावर थेट कारवाई करण्याचे नोटिसीमध्ये म्हटले
आहे.
पुरावे सादर करण्याची मुदत चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा स्थितीत इंदिरा नगरातील गोरगरीब नागरिक, रोजमजुरी बुडवत जुने कागदपत्रे, पुरावे शोधण्यासाठी धावपळ करताना दिसत आहे. प्रशासनाने येथील नगरपंचायत कार्यालयाला नोटीस बजावून आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याने हे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे. ६० ते ७० वर्षांपासून वास्तव्य असणाऱ्या गरीब कुटुंबांना या कारवाईत टारगेट करण्यात आल्याने नागरिकांत, व्यापाऱ्यांत या कारवाईने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संपूर्ण शहरात केवळ अतिक्रमणाच्या नोटिसीची चर्चा होत आहे.
गट नं. ९५६ ही जमीन शहराच्या मध्यभागी असून, नगरपंचायत स्थापनेपूर्वी या जमीन क्षेत्रावर प्रत्यक्ष ग्रामपंचायत कार्यालयाचा ताबा राहीला. ग्रामपंचायत बरखास्तीनंतर ही जमीन नगरपंचायत कार्यालयाच्या अखत्यारित आली; परंतु महसूल रेकॉर्डला याची कोणतीही नोंद निर्धारित वेळेत झाली नसल्याने हा गोंधळ उडाला आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण कारवाई या प्रकारामुळे वेगळ्या वळणावर गेली असून, आमच्या घरांचे काय होणार? असा एकच प्रश्न नागरिक विचारत आहेत.