‘त्या’ दवाखान्यास बजावल्या नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:04 AM2021-04-16T04:04:26+5:302021-04-16T04:04:26+5:30
फुलंब्री : शहरातील खासगी दवाखान्यातील डॉक्टर त्यांच्याकडे येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देत नसल्याचे पुढे येत आहे. ...
फुलंब्री : शहरातील खासगी दवाखान्यातील डॉक्टर त्यांच्याकडे येणाऱ्या कोरोना संशयित रुग्णाची माहिती आरोग्य विभागाला देत नसल्याचे पुढे येत आहे. परिणामी रुग्ण संख्येसह प्रादुर्भाव वाढीस ते कारणीभूत ठरत आहे. अशा रुग्णांची ओळख पटत नसल्याने आरोग्य विभागाला अडचणी येत आहेत. त्यामुळे फुलंब्री शहरातील काही खासगी दवाखान्यात नगर पंचायतकडून नोटीसा बजावण्यात आल्याने डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे.
कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता नगर पंचायतकडून कडक उपयोजना सुरू असून, त्याची अंमलबजावणी शुक्रवारपासून होणार असल्याचे नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी स्पष्ट केले. फुलंब्री तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णाची संख्या वेगाने वाढत आहे. ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने फुलंब्री शहरात विविध खरेदीसाठी सातत्याने येत असल्याने शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे यावर मात करण्यासाठी नगर पंचायतने महत्त्वाच्या उपयोजना राबविण्याचा निर्णय घेतला असून, त्यांची अंमलबजावणीस सुरुवात केली आहे.
-----
शहरातील सर्व दुकानदारांनी प्रत्येक १५ दिवसांनी कोरोना चाचणी करणे अनिवार्य असून, लसीकरणसुद्धा करून घ्यावे. जे दुकानदार या नियमांचे पालन करणार नाही, त्यांचे दुकान बंद करण्यात येणार आहे.
------
शहरातील फळ विक्रेते हे रस्त्यावरच आपले दुकाने लावत असल्याने त्यांना जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर जागा देण्यात आली असून, त्या ठिकाणी संबंधित दुकाने लागणार आहेत.
------
फुलंब्री शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता नागरिकांच्या हितासाठी नगर पंचायतकडून उपयोजना केल्या जात आहेत. दुकानदारासह नागरिकांनी सहकार्य करावेत, असे आवाहन नगराध्यक्ष सुहास सिरसाठ यांनी केले आहे.