मुरूम बाजार समितीला नोटीस

By Admin | Published: April 30, 2017 11:59 PM2017-04-30T23:59:06+5:302017-04-30T23:59:43+5:30

उमरगा :मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव व संचालक मंडळाने केलेला खुलासाही असमाधानकारक वाटल्याने जिल्हा उपनिबंधकांनी कार्यवाही करण्यात येईल’ असा इशारा दिला.

Notice to the Murum Market Committee | मुरूम बाजार समितीला नोटीस

मुरूम बाजार समितीला नोटीस

googlenewsNext

उमरगा : मराठवाड्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख निर्माण केलेल्या मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारात गैरव्यवहार व अनियमितता होत असल्याची तक्रार आल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार याची चौकशी करण्यात आली. यात अनेक गैरप्रकार समोर आल्यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी समितीचे सभापती, संचालक मंडळासह सचिवांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. परंतु, सचिव व संचालक मंडळाने केलेला खुलासाही असमाधानकारक वाटल्याने जिल्हा उपनिबंधकांनी ‘प्रशासक का नेमू नये याचा खुलासा १५ दिवसात लेखी सदर करा, अन्यथा समितीविरुद्ध कार्यवाही करण्यात येईल’ असा इशारा नोटिसीद्वारे दिला आहे.
मुरूम कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठ्या प्रमाणात तुरीची आवक होते. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे या आवकमध्ये वाढ झाली होती. परंतु, बाजार समितीने १ जानेवारी २०१७ पासून अचानक तुरीचा लिलाव बंद केला, तसेच आडत दुकानदारांचे परवाना नूतनीकरण अर्ज घेऊनही परवाने नूतनीकरणकरिता शुल्क भरून घेतले नाही, यासह अन्य आरोप करत समितीच्या गैरकाराभाराची चौकशी करण्याची मागणी भाजप नेते तथा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजू मिनियार यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे केली होती. या मागणीवरून जिल्हा उपनिबंधकांनी सहायक निबंधक यांना चौकशीचे आदेश दिले होते. सहायक निबंधकांनी केलेल्या चौकशीअंती बाजार समितीने डिसेंबर २०१६ ते १८ मार्च २०१७ या कालावधीत ४८३५ क्विंटल तूर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्री केल्याचे रजिस्टरच्या नोंदीत दिसून आले आहे. यात गंभीर बाब म्हणजे सचिवाच्या लेखी सांगण्यावर १४४१३.९३ क्विंटल तूर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी-विक्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रजिस्टरमधील नोंदीत आणि सचिवाने दिलेल्या माहितीत तूर खरेदी-विक्रीमध्ये मोठी तफावत असल्याचे म्हटले आहे. अशातच चौकशी दरम्यान बाजार समितीमध्ये आलेल्या तुरीच्या आवकबद्दल समितीने टोकन पास, शेतकऱ्यांचे नाव, वाहन क्रमांक, वाहन मालकाचे नाव याबद्दलची सविस्तर माहिती नोंदविली गेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तुरीची आवक किती झाली? किती विक्री झाली? कोणत्या दराने व्यवहार झाला? याची अचूक माहिती मिळाली नसल्यामुळे बाजार समितीने तूर खरेदी-विक्रीत गैरव्यवहार केला आहे, असा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला आहे. तुरीच्या खरेदी-विक्री व्यवहाराबद्दल बाजार समितीच्या दप्तरी मोठी तफावत असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय या चौकशी दरम्यान चौकशी अधिकाऱ्याने बाजार समितीमधील बऱ्याच आडत दुकानांची पाहणी केली असता जवळपास ५० ते ६० हजार क्विंटल तूर आडत्यांकडे शिल्लक असल्याचे सकृतदर्शनी दिसून आलेले आहे. त्यामुळे आडत्याकडे आलेल्या शिल्लक तुरीची नोंद बाजार समितीकडे का नाही? अशी विचारणा करत बाजार समिती व आडत्यांकडून संगनमताने ५० ते ६० हजार क्विंटल तुरीच्या खरेदी-विक्रीत गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने समितीविरूद्ध तातडीने योग्य ती कारवाई करावी, अशा स्वरूपाचा अहवाल जिल्हा उपनिबंधकांना दिला होता. त्यावर समितीचे सभापती, संचालक मंडळासह सचिवाला नोटीस देवून पंधरा दिवसांत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. संंबंधितांनी खुलासा सादर केला. परंतु, तो खुलासा असमाधानकारक असल्याचे सांगत समितीवर प्रशासक का नेमू नये? अशी विचारणा करणारी नोटीस देण्यात आली आहे. सदरील नोटिसेचे उत्तर देण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Notice to the Murum Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.