गुणवत्ता घसरल्यामुळे आणखी पाच शिक्षकांना नोटीस; ‘सीईओं’च्या आदेशाने कारवाई
By राम शिनगारे | Published: March 27, 2024 01:47 PM2024-03-27T13:47:02+5:302024-03-27T13:47:57+5:30
तपासणीसाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात पथकाची स्थापना
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी भेट दिल्यानंतर गुणवत्ता प्रचंड घसरलेली असल्याचे त्यांना आढळून आले होते. लासूर स्टेशन येथील जि. प. शाळेलाही सीईओंनी भेट दिली तर प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोकूळ जळगाव येथील जि. प. शाळेला भेट दिली. या दोन्ही शाळांमध्ये गुणवत्ता घसरल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दोन शाळांतील पाच शिक्षकांना नोटीस देत गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेचे सीईओ विकास मीना यांना १९ मार्च रोजी पाबळतांडा येथील जि. प. शाळेला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांना शाळेतील २२ पैकी केवळ एकच विद्यार्थ्यास संख्या वाचन व गणितीय क्रिया करता आल्या. या प्रकरणात त्या शाळेतील सहशिक्षक दिलीप ढाकणे यांच्यावर निलंबनाची कारवाई सीईओंनी केली. त्यामुळे शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे. विविध शिक्षक संघटनांनी ही सूडबुद्धीची कारवाई असल्याचे स्पष्ट करीत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, त्यानंतरही सीईओंच्या शाळांना गाठी-भेटी थांबलेल्या नाहीत. सीईओंनी लासूर स्टेशन येथील शाळेला भेट दिली असता, त्याठिकाणी गुणवत्ता घसरल्याचे दिसून आले. या शाळेतील दोन शिक्षकांना नोटीस देण्यात आली आहे. त्याशिवाय प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी बोकूळ जळगाव येथील शाळेला भेट दिली. तेथेही हीच परिस्थिती आढळून आली आहे. त्यामुळे त्याठिकाणच्या तीन शिक्षकांना नोटीस दिल्यामुळे नोटीस पाठविलेल्या शिक्षकांची संख्या पाचवर पोहोचली आहे. तर एका शिक्षक नेत्याला निलंबित करण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांनी दिली.
आता होणार शाळांची तपासणी
सीईओ विकास मीना यांच्या आदेशानुसार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात शाळांच्या तपासणीसाठी प्रत्येक तालुक्यात एक पथकच नेमले आहे. या पथकात विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख असणार आहेत. हे पथक शाळांमधील गुणवत्ता तपासणी, भौतिक सुविधा आणि मतदान केंद्रांची तपासणी करणार आहेत.
२३४ शिक्षक शाळांमध्ये रुजू
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मराठी माध्यमात २०४ आणि उर्दू माध्यमात ३०, असे एकूण २३४ शिक्षक रुजू झाले आहेत. तसेच उर्वरित शिक्षक लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतरच रुजू होतील, असेही शिक्षण विभागातून सांगण्यात आले.