सिडकोकडून १२ विकासकांना नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2019 10:43 PM2019-05-05T22:43:11+5:302019-05-05T22:43:21+5:30
सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखांकन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.
वाळूज महानगर : सिडको अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकाम व रेखांकन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. यांतर्गत सिडकोने वडगाव कोल्हाटी, शेकापूर शिवारातील गटनंबरमधील १२ विकासकांना अनधिकृत बांधकाम व रेखांकन केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या असून, उर्वरित लोकांना नोटिसा बजावण्याचे काम सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
वाळूज महानगर परिसरातील वडगाव कोल्हाटी, शेकापूर आदी भागात सिडको अधिसूचित क्षेत्रात अनेक विकासकांनी स्थानिक ग्रामपंचयातीच्या मदतीने अनधिकृतपणे रेखांकन करुन घरे व मोकळ्या भूखंडाची विक्री सुरु केली आहे. याविरोधात सिडको प्रशासनाने कारवाई सुरु केली असून, गटनंबर ९ मधील ६, गटनंबर ५ मधील ५ तर गट नंबर ६ मधील १ जण अशा एकूण १२ विकासकांना नोटिसा बजावल्या आहेत. तर गट नंबर १०/१ मधील ८, गट नंबर १०/२ मधील २, गट नंबर ११ मधील ५, गट नंबर १२ मधील ७, गट नंबर १३ मधील ५ अशा एकूण २७ विकासकांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी सांगितले.
४० पेक्षा अधिक गुन्हे दाखल
सिडको अधिसूचित क्षेत्रात नियमबाह्यपणे रेखांकन व बांधकाम करणाºया विकासकांविरुद्ध प्रशासनाने थेट फौजदारी कारवाई सुुरु केली आहे. नोटिसा देवूनही आपले म्हणणे न मांडणाºया वडगाव कोल्हाटी, शेकापूर, तीसगाव, गोलवाडी, वाळूज आदी परिसरातील जवळपास ४० पेक्षा अधिक विकासकांवर विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत.