पंचवीस कृषी सेवा केंद्रांना नोटिसा
By Admin | Published: July 19, 2016 11:55 PM2016-07-19T23:55:58+5:302016-07-20T00:30:10+5:30
औरंगाबाद : कृषी विभागाचे पथक तपासणीसाठी गेले असताना बंद आढळलेल्या २५ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
औरंगाबाद : कृषी विभागाचे पथक तपासणीसाठी गेले असताना बंद आढळलेल्या २५ कृषी सेवा केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. ही दुकाने औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांतील आहेत. यातील काही जणांनी तपासणीच्या भीतीने पोबारा केल्याचा संशय आल्यामुळे कृषी विभागाने या नोटिसा बजावल्या. समाधानकारक खुलासा न आल्यास या दुकानचालकांना परवाना रद्द करण्याची कार्यवाहीदेखील कृषी विभागाकडून केली जाणार आहे.
खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यांत एकूण ३२ पथके स्थापन करण्यात आली होती. जून महिन्यात ठिकठिकाणी जाऊन कृषी सेवा केंद्रांवर पाहणीही करण्यात आली.
या पाहणीत केंद्रचालकाकडील माल, त्याच्या विक्रीच्या नोंदी आदी तपासण्यात आल्या. मात्र बऱ्याच ठिकाणी पाहणीसाठी पथक गावात पोहोचताच दुकानचालकांनी दुकान बंद करून पोबारा केला. त्यामुळे अनेक दुकाने बंद आढळली. अशा दुकानचालकांना कृषी विभागाने कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.
यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड, विहामांडवा, दाभाडी, बीड जिल्ह्यांतील सिरसदेवी, जालना जिल्ह्यातील रोहिलगड आदी ठिकाणच्या दुकानांचा समावेश आहे. यातील काही जणांकडून खुलासेही सादर झाले आहेत.