दोन गावठी कट्ट्यांसह कुख्यात गुन्हेगार अजय रगडे जेरबंद, साथीदारही पकडला

By बापू सोळुंके | Published: November 26, 2023 07:27 PM2023-11-26T19:27:47+5:302023-11-26T19:29:12+5:30

शनिवारी मध्यरात्री सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी उस्मानपुरा पोलिसांना सोबत घेऊन छापा टाकून ही कारवाई केली.

Notorious criminal Ajay Ragde jailed, accomplice also nabbed along with two pistols | दोन गावठी कट्ट्यांसह कुख्यात गुन्हेगार अजय रगडे जेरबंद, साथीदारही पकडला

दोन गावठी कट्ट्यांसह कुख्यात गुन्हेगार अजय रगडे जेरबंद, साथीदारही पकडला

छत्रपती संभाजीनगर : श्रेयनगर येथील एका घरात मित्रासह मुक्कामी असलेला कुख्यात गुन्हेगार अजय रगडे आणि त्याच्या साथीदाराला दोन गावठी कट्टे, ९ जिवंत काडतुसे आणि धारदार चाकूसह पोलिसांनी छापा मारून पकडले. शनिवारी मध्यरात्री सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांनी उस्मानपुरा पोलिसांना सोबत घेऊन छापा टाकून ही कारवाई केली.

अजय गुलाबराव रगडे (वय ३०, रा. श्रेयनगर) आणि विलास अंकुश जाधव (२४, रा. सातारा परिसर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. कुख्यात गुन्हेगार अजय रगडे हा श्रेयनगर येथे त्याच्या मित्रासह मुक्कामी आहे आणि त्यांच्याजवळ प्राणघातक शस्त्रे असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस आयुक्त रणजित पाटील यांना मिळाली. यानंतर त्यांनी उस्मानपुरा पोलिसांना सोबत घेऊन रात्री १:१५ वाजण्याच्या सुमारास श्रेयनगर येथील संशयित घरावर छापा टाकला. तेव्हा तेथे कुख्यात गुन्हेगार अजय रगडे आणि विलास जाधव होते. 

यावेळी पोलिसांनी ते राहत असलेल्या खोलीची झडती घेतली असता एका बॅगमध्ये दोन गावठी कट्टे आणि ९ जिवंत काडतुसे, एक धारदार चाकू आणि २८ हजार २०० रुपयांची रोकड असा सुमारे १ लाख २८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. पोलिस उपनिरीक्षक विनोद आबूज यांनी दोन्ही आरोपींविरोधात उस्मानपुरा पोलिस ठाण्यात सरकारतर्फे फिर्याद नोंदविली. दोन गावठी कट्टे, जिवंत काडतुसे आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली. रगडेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे शहरातील दोन पोलिस ठाण्यांत नोंद आहेत. एका गुन्ह्यात तो सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटलेला आहे, दुसऱ्या गुन्ह्यात तो सध्या जामिनावर जेलमधून सुटलेला होता. यानंतर त्याने पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकावर प्राणघातक हल्ला केला होता, असे पोलिसांनी सांगितले.

पुंडलिकनगर येथील खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात फरार
पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात नोंद झालेल्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात रगडे फरार आहे. सहायक पोलिस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांनी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले.
 

Web Title: Notorious criminal Ajay Ragde jailed, accomplice also nabbed along with two pistols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.