देवगिरी एक्स्प्रेस अडवून लुटणारा कुख्यात गुन्हेगार जेरबंद; रेल्वे पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:02 PM2022-05-05T19:02:34+5:302022-05-05T19:03:33+5:30
रेल्वे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत अडीच लाख रुपयांचे सोने जप्त
औरंगाबाद : देवगिरी एक्स्प्रेस पोटूळ रेल्वेस्थानकात सिग्नलचे कनेक्शन कट करून थांबविली. त्यानंतर रेल्वेवर दगडफेक करीत चोरट्यांनी खिडकीमध्ये हात टाकून एका महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळे सोन्याची चेन लुटून नेली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपीला रेल्वे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून हिसकावलेली चेनही परत मिळविल्याची माहिती निरीक्षक सुरेश भाले यांनी दिली.
शिवानंद ठकसेन काळे (४०, रा. वाळूज) असे आरोपीचे नाव आहे. २२ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान पोटूळ रेल्वेस्थानक येथे रेल्वे थांबवून लूटमार केली होती. रेल्वेच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजसह इतर बाबींची तपासणी केली. सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव यांना २६ एप्रिल रोजी सिडको एन-७ भागात चोरीची चेन विक्रीसाठी काही जण आल्याची माहिती मिळाली. तपास केला असता यात शिवानंद काळे असल्याचे स्पष्ट झाले. तो सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्याच्या हालचालीवर पोलिसांनी लक्ष ठेवले. १ मे रोजी काळे बाहेरगावी जात असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून काळे यास घराच्या परिसरातच शिताफीने पकडले.
आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चाेरी केलेली सोन्याची चेन वरखेड, (ता. नेवासा, जि. नगर) येथे विक्री केल्याचे सांगितले. सोन्याच्या दुकानदाराकडून चेन जप्त केली. ही कामगिरी निरीक्षक सुरेश भाले, एपीआय प्रशांत गंभीरराव, सहायक उपनिरीक्षक शंकर राठोड, नाईक प्रमोद जाधव, प्रशांत मंडळकर, सूरज गभणे यांनी केली. या पथकास निरीक्षक साहेबराव कांबळे, सहायक निरीक्षक अमोल देशमुख, हवालदार राहुल गायकवाड, सोनाली मुंढे यांनी मदत केली.
पथकास दहा हजार रुपयांचे बक्षीस
रेल्वे पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली. आरोपी शोधण्यात यश आल्यामुळे तपास पथकास अधीक्षकांनी रोख दहा हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.