दहशत पसरविणारा गौतम जाधव हर्सुल कारागृहात स्थानबद्ध
By राम शिनगारे | Published: May 19, 2024 05:17 PM2024-05-19T17:17:15+5:302024-05-19T17:19:53+5:30
ग्रामीण पोलिस अधिक्षकांची कारवाई : गंभीर गुन्ह्यांमुळे लावला एमपीडीए कायदा
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत धोकादायक बनलेला गुंड गौतम जाधव याच्यावर ग्रामीण पोलिसांनी कडक कारवाई करीत एमपीडीए कायद्यानुसार वर्षभरासाठी हर्सुल कारागृहात रवानगी केली आहे. जाधव याच्या विरोधात गंभीर स्वरुपाचे विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे ग्रामीण पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया यांनी ही कारवाई केली.
विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महालगाव येथील गौतम वाल्मिक जाधव (२७) याच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारची एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये जिवे मारण्याचा प्रयत्न, खंडणी वसुल करणे, गरैकायद्याची मंडळी जमवुन दुखापत करणे, शस्त्रांचा धाक दाखवणे, अवैधरित्या दारु विक्री करणे, जुगार खळणे अशा विविध गुन्ह्यांचा समावेश आहे.
गौतम जाधव याच्यावर यापूर्वीही प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केली होती. मात्र, त्याचा काहीएक उपयोग झालेला नाही. त्याची गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे पोलिस अधिकक्षक मनिष कलवानिया यांनी त्याच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार करवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अप्पर पोलिस अधिक्षक सुनील लांजेवार, सहायक पोलिस अधिक्षक महक स्वामी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ, विरगावे सहायक निरीक्षक शंकर वाघमोड, उपनिरीक्षक दिपक औटे, पोलिस नाईक गणेश जाधव, दीपक सुरवसे यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला.
या प्रस्तावास जिल्हादंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी १२ मे रोजी प्रस्तावास मान्यता दिली. त्यानंतर १८ मे रोजी गौतम जाधव यास स्थानबद्धतेचे आदेश तामील करून हर्सुल कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली. ही कारवाई अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आतापर्यंत १२ गुन्हेगारांना हर्सुलवारी
पोलिस अधीक्षक कलवानिया यांनी पदभार स्विकारल्यापासून आतापर्यंत तब्बल १२ कुख्यात गुंडाच्या विरोधात एमपीडीए कायद्यानुसार कारवाई केली आहे. या कारवाईनुसार संबंधित गुन्हेगार वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले. त्याचा परिणाम गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण कमी होण्यात झाले आहे.