कुख्यात हातभट्टी तस्कर विनोद जैस्वाल 'एमपीडीए'अंतर्गत तुरुंगात

By राम शिनगारे | Published: July 16, 2023 07:41 PM2023-07-16T19:41:51+5:302023-07-16T19:42:01+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : मागील काही दिवसांत तिसऱ्या आरोपीवर कारवाई

Notorious desi liquor smuggler Vinod Jaiswal in jail under 'MPDA' | कुख्यात हातभट्टी तस्कर विनोद जैस्वाल 'एमपीडीए'अंतर्गत तुरुंगात

कुख्यात हातभट्टी तस्कर विनोद जैस्वाल 'एमपीडीए'अंतर्गत तुरुंगात

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कुख्यात हातभट्टी तस्कर म्हणून दहशत निर्माण करणारा विनोद धन्नूलाल जैस्वाल (४०, रा. औराळा, ता. कन्नड) यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए ॲक्टअंतर्गत एक वर्षासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले आहे. जिल्ह्यात हातभट्टीमुक्त अभियान राबविताना जैस्वालवर कारवाई केल्यानंतरही त्याने मानवी जीवितास धोकादायक ठरेल अशी हातभट्टीची निर्मिती सुरूच ठेवल्यामुळे कारवाई केल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.

जैस्वाल कन्नड तालुक्यासह नजीकच्या परिसरातील धाबे, हॉटेलमध्ये धोकादायक हातभट्टीसह बेकायदा देशी, विदेशी दारूची विक्री करीत होता. त्याच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभाग व देवगाव रंगारी पोलिसांनी अनेक वेळा छापे मारून गुन्हे नोंदविले. त्याचा जैस्वालवर कोणताही परिणाम झाला नाही.

उलट त्याच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनात जैस्वालचा एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला गेला. त्या प्रस्तावास जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी १४ जुलै रोजी मंजुरी दिली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने त्यास हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. या कारवाईमुळे हातभट्टी चालकांचे धाबे दणाणले आहे. ही कारवाई अधीक्षक संतोष झगडे, उपअधीक्षक ए. डी. देशमुख, शरद फटांगडे, अनिरुद्ध पाटील, निरीक्षक डहाके, गुरव, दुय्यम निरीक्षक एस. डी. घुले, एस. बी. रोटे, ए. ई. तातळे, एस. एस. पाटील, स्मिता माने यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.

कारवाई झालेला पहिला हातभट्टी तस्कर
राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीएअंतर्गत वर्षभरासाठी स्थानबद्ध केलेला विनाेद जैस्वाल हा पहिला हातभट्टी तस्कर आहे. याच विभागाने यापूर्वी अवैध दारू तस्कर कृष्णा पोटदुखे, चिंग्या उर्फ भावलाल जऱ्हाडे यांनाही हर्सूल कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध केले आहे.

Web Title: Notorious desi liquor smuggler Vinod Jaiswal in jail under 'MPDA'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.