कुख्यात हातभट्टी दारू तस्कर चिंग्या हर्सूल कारागृहामध्ये स्थानबद्ध
By राम शिनगारे | Published: February 1, 2023 06:22 PM2023-02-01T18:22:19+5:302023-02-01T18:24:43+5:30
दुसऱ्या आरोपीवर एमपीडीए कायद्यातंर्गत कारवाई
औरंगाबाद : जालना, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात बनावट हातभट्टी देशी दारुची तस्करी करणारा कुख्यात भाऊलाल उर्फ चिंग्या देवचंद जऱ्हाडे (३४, ह.मु. पिसादेवी, रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना) यास राज्य उत्पादन शुल्क विभागाने एमपीडीए कायद्यानुसार वर्षभरासाठी हर्सूल कारागृहात स्थानबद्ध केले. मागील सहा महिन्यात ही दुसरी कारवाई असल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हातभट्टी तस्कार चिंग्याच्या विरोधात चिकलठाणा, पाचोड, मंठा, अंबड पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. त्याशिवाय औरंगाबाद, जालना उत्पादन शुल्क विभागानेही त्याच्यावर दारुची तस्करी केल्याबद्दल गुन्हे नोंदविले आहेत. चिंग्या हा बनावट दारु तयार करुन विकण्यासाठी परिसरातील नागरिकांनी शिविगाळ, धमक्यासह मारहाण करीत होता. त्याच्या दहशतीमुळे पाचोड, चिकलठाणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. त्याच्या गंभीर गुन्ह्यांची दखल घेत अधीक्षक संतोष झगडे यांनी एमपीडीए कायद्यानुसार प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार प्रस्ताव तयार केल्यानंतर मान्यतेसाठी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर केला. त्यास पांडेय यांनी ३१ जानेवारी रोजी मंजुरी दिली. त्यानुसार १ फेब्रुवारी रोजी चिंग्याला हर्सूल कारागृहात तामिलकरून स्थानबद्ध केल्याचे झगडे यांनी सांगितले. ही कामगिरी झगडे यांच्या मार्गदर्शनात उपअधीक्षक प्रदीप पोटे, निरीक्षक विजय रोकडे, दुय्यम निरीक्षक शरद रोटे, अरुण तातळे, भरत दौंड, प्रदीप मोहिते, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश नागवे, प्रविण पुरी यांच्यासह इतरांनी केली.
पोटदुखे, चिंग्यानंतर ढाब्यावाल्यांचा नंबर
उत्पादन शुल्क विभागाने हाटभट्टी विक्रेता कृष्णा सीताराम पोटदुखे यास हर्सूलमध्ये एमपीडीए कायद्यानुसार १४ ऑगस्ट २०२२ रोजी स्थानबद्ध केले होते. त्यानंतर १ फेब्रुवारी रोजी चिंग्याचा नंबर लागला. यानंतर आता अवैध दारु विक्री करणारे ढाब्यांवाल्यांवर अशा पद्धतीची कारवाई केली जाईल, अशी माहिती अधीक्षक झगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.