कुख्यात घरफोड्याला ठोकल्या बेड्या: तब्बल ३२ गुन्हे दाखल
By राम शिनगारे | Published: October 29, 2023 09:16 PM2023-10-29T21:16:20+5:302023-10-29T21:16:37+5:30
गुन्हे शाखेची कारवाई
छत्रपती संभाजीनगर : नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगावसह छत्रपती संभाजीनगरात घरे फोडून धुमाकूळ घालणाऱ्या रेकॉर्डवरील कुख्यात आरोपीच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्याच्यावर ३२ गुन्हे दाखल असून एन-१, सिडको भागात घर फोडून त्याने साडेसहा लाखांचा ऐवज लंपास केला होता. २९ ऑक्टोबरला ही कारवाई करण्यात आली.
राजेंद्र ऊर्फ राजन बाबासाहेब राऊत ऊर्फ राजू बाबासाहेब मुजमुले (रा. साईनगर, परतूर, जि. जालना) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, जरीन फिरोजअली रामानी यांचे गोल्डन अपार्टमेंट, एन-१, सिडको भागात घर आहे. ६ डिसेंबर २०२२ रोजी चोरट्यांनी लॉक तोडून घर फोडले होते. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दखल आहे. या प्रकरणाचा तपास एमआयडीसी सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी करीत होते.
उपनिरीक्षक विशाल बोडखे यांना हा गुन्हा कुख्यात राजेंद्र ऊर्फ राजन राऊत ऊर्फ मुजमुले याने केल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी राजनचा शोध घेतला असता तो परतूर येथे घरी असल्याची खात्री पटल्यावर उपनिरीक्षक बोडखे यांच्यासह सहायक उपनिरीक्षक सतीश जाधव, अंमलदार संजय नंद, संजयसिंह राजपूत, संदीप राशीनकर, राहुल खरात यांच्या पथकाने परतूर गाठले. त्यांनी राजनला हेरले. पोलिस आल्याचे समजताच राजनने धूम ठोकली. मात्र, पथकाने पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. खाक्या दाखविताच त्याने घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्याला एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.