कुख्यात मंगळसूत्र चोर विक्की हेल्मेट एमपीडीएखाली स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:05 AM2021-08-18T04:05:31+5:302021-08-18T04:05:31+5:30
कुख्यात विक्की ऊर्फ हेल्मेट याच्याविरोधात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे, धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करणे, मारहाण करणे, धारदार शस्त्र घेऊन फिरून ...
कुख्यात विक्की ऊर्फ हेल्मेट याच्याविरोधात मंगळसूत्र चोरीचे गुन्हे, धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करणे, मारहाण करणे, धारदार शस्त्र घेऊन फिरून दहशत निर्माण करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मुकुंदवाडी आणि उस्मानपुरा, जवाहरनगर पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर अनेकदा प्रतिबंधात्मक कारवाई केली. एवढेच नव्हे, तर त्याला २०१७ मध्ये दोन वर्षांकरिता शहरातून हद्दपार केले होते.
जयभवानीनगर येथे काही दिवसांपूर्वी त्याने एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र हिसकावून नेले होते. तो सतत गुन्हे करीत असल्याचे पाहून पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी मंगळवारी त्याच्याविरोधात एमपीडीएचे आदेश जारी केले. पोलीस उपायुक्त दीपक गिर्हे, सहायक आयुक्त रवींद्र साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, सहायक निरीक्षक द्वारकादास भांगे, महिला हवालदार आशा केंद्रे, दीपाली सोनवणे, महादेव दाणे, समाधान काळे, रवींद्र सिरसाट यांनी ही कारवाई केली.