यापुढे एकटेच लढणार आणि जिंकणार! उद्धव ठाकरेंकडून स्वबळाचा पुनरुच्चार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2018 02:26 PM2018-02-04T14:26:58+5:302018-02-04T14:27:30+5:30
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
औरंगाबाद - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्वबळाचा पुनरुच्चार केला. यापुढे प्रत्येक निवडणुकीत एकटेच लढणार आणि निवडणूक जिंकणार, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शरद सहकारी साखर कारखान्याच्या द्वितीय गळीत हंगामाचा शुभारंभ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला. यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला.
25 वर्ष भाजपला सांभाळले. प्रत्येक वेळी मदत केली. मात्र आता एकटेच लढणार आणि एकटेच विजयी होणार आहोत. नुकसान कोणाचे होणार हे कळलेच. घरात घुसायला लागलात. आता सोडणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेनेने राज्यात सर्वात अगोदर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतकरी हा विषय शहरात मांडला. कारण शेतकरी हा अन्नदाता आहे. त्याला कर्जमुक्त करण्याचे उद्दिष्ट शिवसेनेचे आहे. जी काही शेतकऱ्यांना मदत मिळाली. ती शिवसेनेमुळेच मिळाली असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले.
2022 पर्यंत राहणार का?
केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पडला आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांना हे देणार, ते देणार, दुप्पट उत्पन्न करणार हे सगळं खरंय पण तुम्ही राहणार आहात का? तुमचा निकाल जनताच लावणार आहे. नुसत्याच घोषणा केल्या जात आहेत. अंमलबजावणीचा पत्ता नाही. सौभाग्य योजना, उज्जवला योजना अशा योजनांची संख्या मोजा, आपणाला आठवणार नाहीत. पण नुसत्याच घोषणा. यामुळे आता एकटी शिवसेना एकहाती सत्ता मिळवेल आणि विकासाची गंगा शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले, असेही ठाकरे म्हणाले.
डल्ला मारणारे हल्लाबोल करताहेत
सध्या काहीजण रस्त्यावर उतरले आहेत. शिवसेना सत्तेत असून विरोधाची भूमिका घेत असल्याची टीका करतात.पण स्वतःसाठी कधीतरी टीका केली का? जनतेसाठीच टीका करत आहोत. परंतु हे डल्ला करणारेच हल्लाबोल करत आहेत, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.
भाषण अर्ध्यावर सोडावं लागलं
उद्धव ठाकरे यांनी भाषण करण्यासाठी सुरुवात केली. मात्र जनरेटर सतत बंद पडत असल्यामुळे अर्ध्यावर सोडून द्यावे लागले.