आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे : जयंत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 07:15 PM2018-09-26T19:15:07+5:302018-09-26T19:16:20+5:30
आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
औरंगाबाद : आता कुठे बदलाचे वातावरण तयार होत आहे. लोक पर्याय शोधताहेत आणि भविष्यकाळ निधर्मी विचारांना पाठिंबा देणारा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मराठवाडा साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार पाटील यांच्या हस्ते मसापच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मधुकरअण्णा मुळे यांना मंगळवारी देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
त्यांनी सांगितले की, आज तरुण पिढी शिक्षणापेक्षा धर्माकडे अधिक ओढली जाते आहे. धर्माधर्मांत तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. राज्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी झाल्यानंतर हे घडत असते. दंगली होणार नाहीत, शांतता राहील, असा विश्वास निर्माण करू शकलो, तर आपल्या देशातही विदेशी गुंतवणूक होऊ शकते. हातांना आज काम नाही. त्यामुळे तो आरक्षणासाठी आग्रही दिसतोय. त्यासाठी लाखोंचे मोर्चे निघू लागले आहेत.
‘नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्या ज्या तरुणांनी केल्या ते तरुण पाहिल्यानंतर आणि अलीकडे नालासोपाऱ्यात ज्या तरुणकडे शस्त्रास्त्रे सापडली त्यावरून असे लक्षात येते की, अशा धाडसाला कुठेतरी पाठबळ मिळतेय. दाभोलकर यांच्या हत्येच्या कटाची पाळेमुळे जालन्यात सापडतात, हे सारेच आश्चर्यजनक असल्याचे ते म्हणाले. पेट्रोलचे दर शंभरच्या वर केल्याशिवाय यांना झोप लागणार नाही, असा टोलाही राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी लगावला.