आता औरंगाबादहून राज्यराणी एक्स्प्रेसने ७ तासांत मुंबई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 01:27 PM2020-01-07T13:27:12+5:302020-01-07T13:29:52+5:30
सकाळी १०.०७ वाजता ही रेल्वे सीएसटी मुंबई येथे दाखल होईल.
औरंगाबाद : मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस ही रेल्वे १० जानेवारीपासून नांदेडहून धावणार आहे. या रेल्वेचे वेळापत्रक अखेर जाहीर झाले आहे. नांदेड येथून रात्री १० वाजता ही रेल्वे सुटेल आणि औरंगाबादला पहाटे २.३५ वाजता दाखल होईल. त्यानंतर १० मिनिटांच्या थांब्यानंतर ही रेल्वे २.४५ वाजता पुढे रवाना होईल. जवळपास ७ तासांनी म्हणजे सकाळी १०.०७ वाजता ही रेल्वे सीएसटी मुंबई येथे दाखल होईल.
मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेसच्या विस्तारीकरणावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. रेल्वेचे वेळापत्रक आणि थांबे समोर आले. या रेल्वेला लासूर आणि रोटेगाव येथे थांबा राहणार आहे. ही रेल्वे लासूर येथे पहाटे ३.१४ येईल आणि ३.१५ वाजता रवाना होईल, तर रोटेगाव येथे ४.०१ वाजता येईल आणि ४.०२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल. औरंगाबादसह या दोन्ही ठिकाणाहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सुविधा होणार आहे. नांदेड ते मुंबई असे ६०७ कि.मी.चे अंतर ही रेल्वे १२ तासांत पूर्ण करणार आहे. ५० कि.मी. प्रतितास या गतीने ही रेल्वे धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली.
नंदिग्राम, ‘देवगिरी’ नंतर रेल्वे
मुंबईसाठी आजघडीला जनशताब्दी, तपोवन, नंदिग्राम, देवगिरी एक्स्प्रेसशिवाय अन्य रेल्वे नाही. राज्यराणी एक्स्प्रेसमुळे मुंबईसाठी आणखी एक रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार आहे.