नामांतराच्या वादात आता भाजपची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:05 AM2021-01-04T04:05:11+5:302021-01-04T04:05:11+5:30
राजू शिंदे : ‘लव्ह औरंगाबाद’चे विमोचन पालकमंत्र्यांनी का केले? औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘लव्ह औरंगाबाद’, ‘सुपर ...
राजू शिंदे : ‘लव्ह औरंगाबाद’चे विमोचन पालकमंत्र्यांनी का केले?
औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात ठिकठिकाणी ‘लव्ह औरंगाबाद’, ‘सुपर संभाजीनगर’ ‘लव्ह खडकी’ अशा आशयाचे बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा नामांतराचा वाद विकोपाला जात आहे. या वादात आता भाजपनेही जाहीरपणे उडी घेतली आहे. महापालिकेतील स्थायी समितीचे माजी सभापती राजू शिंदे यांनी शिवसेनेवर तोफ डागली आहे. शहरातील ‘लव्ह औरंगाबाद’ बोर्डाचे विमोचन शिवसेनेचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले. त्यामुळे शिवसेना पालकमंत्र्यांना शहरात प्रवेश करण्यास रोखणार का, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
रविवारी मुंबईत भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी ‘संभाजीनगर’च्या मुद्द्यावरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सायंकाळी भाजपमधील स्थानिक नेते या मुद्द्यावर अग्रेसर झाले. शहरात नामांतराचा मुद्दा पेटलेला असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतर आम्हाला अमान्य असल्याचे चार दिवसांपूर्वी नमूद केले? होते. शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी रविवारी वृत्तवाहिन्यांशी बोलताना बाळासाहेब थोरात यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपसात चिखलफेक करू नये, असे निकष तिन्ही पक्षातील नेते पाळत आहेत. मात्र खैरे यांच्याकडून हे संकेत पाळले गेले नाहीत. त्यातच सायंकाळी भाजप नेते राजू शिंदे यांनी शिवसेनेवर तोफ डागली. जळगाव रोडवर पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शहरातील पहिल्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. यावेळी भाजप नेतेही उपस्थित होते. भाजप नेत्यांनी मनपा प्रशासनाला स्पष्ट शब्दात बजावले होते की, ‘लव्ह औरंगाबाद’ हा विषय आम्हाला मान्य नाही. त्यानंतरही स्मार्ट सिटी प्रशासनाने शहरात अनेक ठिकाणी बोर्ड उभे केले. मुळात अशा पद्धतीचे वादग्रस्त बोर्ड उभारण्याची परवानगी स्मार्ट सिटीला कोणी दिली? शिवसेना या मुद्द्यावर आता राजकारण करीत आहे. शिवसेनेला औरंगाबाद ...... होते तर त्यांच्याच पालकमंत्र्यांनी अनावरण का केले, असा प्रश्न शिंदे यांनी उपस्थित केला. शिवसेनेचे स्थानिक नेते पालकमंत्र्यांना शहरात येण्यापासून रोखणार आहेत का? एकीकडे विरोध दुसरीकडे आपल्याच नेत्यांसोबत मागे पुढे फिरणे ही दुटप्पी भूमिका शिवसेनेची असल्याचे त्यांनी नमूद केले.