आता व्यापाऱ्यांना ऑफलाइन नव्हे, मेनलाइन म्हणा; कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सची मागणी
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 18, 2023 04:29 PM2023-11-18T16:29:01+5:302023-11-18T16:29:25+5:30
व्यापारी असो वा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी; जिथे जिथे कार्यक्रमाला जातील तिथे ‘मेनलाइन’ व्यापारी असाच उल्लेख करावा.
छत्रपती संभाजीनगर : एखादे उदाहरण देताना ‘नावात काय’ असे म्हटले जाते. पण, सर्व काही ‘नावातच’ असते, याची प्रचिती अनेकदा येत असते. याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. त्याचे कारण, म्हणजे देशात आजघडीला ८ कोटी लहान-मोठे व्यापारी आहेत. वर्षानुवर्षे पिढीजात व्यवसाय करणाऱ्यांना ‘ऑफलाइन’ असे म्हटले जाते. मात्र, आता ही संज्ञा बदलून आम्हाला ‘मेनलाइन’ व्यापारी म्हणा, अशी मागणी देशात जोर धरू लागली आहे. आम्ही ग्राहक सेवेसाठी ‘ऑफ’ नाही तर सदैव ‘ऑन’ असतो. सरकार दरबारीही संज्ञा बदलावी, यासाठी देशभरातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने आग्रही भूमिका घेतली आहे.
ज्या व्यापाऱ्यांची दुकाने, शोरूम आहेत. वस्तू खरेदीसाठी ग्राहक त्यांच्या दुकानात जातात, तिथे प्रत्यक्ष वस्तूंना स्पर्श करतात. व्यापारी त्या ग्राहकांना त्या वस्तूबदल अधिक माहिती सांगतात व खात्री पटल्यावर ती वस्तू ग्राहक खरेदी करतो... असे देशात ८ कोटींच्या जवळपास व्यापारी आहेत. त्यातील ५० टक्के व्यापारी पिढ्यानपिढ्या व्यवसाय करीत आहेत आणि ग्राहकांना सामोरे जात आहेत. मग अशा व्यापाऱ्यांना ‘ऑफलाइन म्हणणे म्हणजे हा सर्व व्यापाऱ्यांचा अपमान आहे, असे कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीया यांनी नमूद केले.
राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, देशांतर्गत व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना ‘ऑफलाइन’ म्हणणे हे विदेशी ई-कॉमर्स कंपन्यांचे षडयंत्र आहे. या कंपन्या स्वत:ला ‘ऑनलाइन’ व स्थानिक व्यापाऱ्यांना ‘ऑफलाइन’ सांगतात. ‘ऑफलाइन’ संज्ञा देऊन भारतीय रिटेल व्यापाऱ्यांची छबी आणि ताकद कमजोर करण्यासाठी या शब्दाचा प्रयोग केला जात आहे. व्यापारी ऑफलाइन म्हणजे व्यवसायिक स्पर्धेतून कधीच बाहेर फेकला गेला नाही, आजही ऑनलाइन व्यापाराशी मोठी स्पर्धा करीत आहे. व्यापारी व ग्राहकांमध्ये विश्वासाचे नाते अतूट आहे. यामुळे आता आम्ही मोहीम सुरू केली असून देशातील ८ कोटी व्यापारी ‘मेनलाइन’ आहोत याचा प्रचार-प्रसार सुरू केला आहे.
‘मेनलाइन’ व्यापारी असा उल्लेख करा
व्यापारी असो वा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी; जिथे जिथे कार्यक्रमाला जातील तिथे ‘मेनलाइन’ व्यापारी असाच उल्लेख करावा. सरकारनेही आता त्यांच्या परिपत्रकात देशांतर्गत व्यापाऱ्यांना ‘मेनलाइन’ असा उल्लेख करावा.
- अजय शाह,वरिष्ठ उपाध्यक्ष (महाराष्ट्र), कॅट