आता खाकी वर्दीतील आईसोबत बागडतील मुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:02 AM2021-09-26T04:02:16+5:302021-09-26T04:02:16+5:30
बापू सोळुंके औरंगाबाद : घर आणि नोकरी सांभाळताना महिला पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. आता ड्युटीचे चार तास कमी ...
बापू सोळुंके
औरंगाबाद : घर आणि नोकरी सांभाळताना महिला पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. आता ड्युटीचे चार तास कमी करून आठ तासांचा निर्णय झाल्यामुळे जास्त आनंद झाला असेल तो महिला पोलिसांच्या मुलांना. आता आईसोबत जास्तवेळ राहाता येईल. बागडता येईल. खेळता येईल. आता आई आमचा अभ्यासही घेईल, अशा प्रतिक्रिया महिला पोलिसांच्या मुलांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केल्या.
महाराष्ट्र पोलीस दलात पुरूष पोलिसांच्या बरोबरीने महिला पोलिसांनाही बारा तास काम करावे लागते. महिला पोलिसांना लहान मुले, सासू सासरे यांची देखभाल करीत नोकरी करावी लागते. शिस्तीच्या खात्यात काम करताना कोणतीही चूक होणार नाही, याची काळजी घेण्यासोबतच लहान मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही, हेही बघावे लागते. आता महिला पोलिसांच्या कर्तव्याचे तास १२ वरून ८ करण्याचा निर्णय पोलीस महासंचालक कार्यालयाने घेतला. या निर्णयामुळे त्यांची मुले आनंदाने बागडू लागली.
प्रतिक्रिया..
आता आई अभ्यास घेईल
आई पोलीस दलात असल्याने ती सकाळी ९ वाजता ड्युटीला जाते व रात्री ९ वाजताच घरी परत येते. इच्छा असूनही ती घरी थांबू शकत नाही. आता तिला आठ तासच ड्युटी मिळणार असल्याचे समजल्याने आम्हांला खूप आनंद झाला. आता आईसोबत बॅटमिंटन खेळता येईल. ती अभ्यासही घेईल.
-धुवराज प्रशांत पाटील. (११ वर्षे)
-------------------------
फार आनंद झाला
ड्युटीसाठी आईला दिवसभर घराबाहेर राहावे लागते. तिने ड्युटीला जाऊ नये. माझ्यासोबतच खेळावे. माझा अभ्यास घ्यावा, असे मला वाटायचे. मात्र, इच्छा असूनही ती पूर्ण करू शकत नव्हती. आता ड्युटीचा कालावधी ८ तासच झाल्याने तिच्यापेक्षा अधिक आनंद आम्हाला झाला.
- श्रेया प्रशांत पाटील (१२ वर्षे)
----------------------
मम्मीसोबत मस्ती करीन
मम्मीच्या ऑफिसची वेळ कमी झाल्याचे काल समजले. मम्मीच्या मोठ्या साहेबांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे मी खूप खूश झाले. मम्मीला जास्तवेळ घरी राहायला मिळणार असल्यामुळे मी आता तिच्यासोबत मस्ती करेन आणि अभ्यास करीन.
-अंशिका जांभोटकर, (६ वर्षे)
----------------------
पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील एकूण ठाणी - १७
महिला पोलिसांची संख्या- ्र्०००