आता औरंगाबादच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात असणार एक कम्युनिटिंग अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 04:13 PM2018-06-23T16:13:32+5:302018-06-23T16:14:47+5:30
जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली.
औरंगाबाद : जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी विविध उपक्रम हाती घेतले असून, याअंतर्गत शहरातील प्रत्येक ठाण्यात कम्युनिटी पोलिसिंगसाठी एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली. या कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुरुवारी बैठक घेऊन त्यांना विविध सूचना केल्या.
पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी शहर पोलिसांनी कम्युनिटी पोलिसिंगवर भर द्यावा, असे आदेशित केले आहे. एवढेच नव्हे तर शहरातील १७ पोलीस ठाण्यांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे १७ पोलीस उपनिरीक्षकांना कम्युनिटी पोलीस अधिकारी म्हणून काम पाहण्याचे आदेश दिले. कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध जाती-धर्माच्या लोकांच्या बैठका घेणे, त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आदेश गुरुवारी झालेल्या बैठकीत देण्यात आले.
पोलीस अधिकाऱ्यांच्या विविध स्तरावर ओळखी असतात. या ओळखीतून बेरोजगारांना नोकरी मिळवून देणे, व्यवसाय करण्यासाठी त्यांना बँकांकडून कर्ज उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करणे, कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत त्यांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणे, आदी कामे आता कम्युनिटी पोलीस अधिकाऱ्यांना करावी लागणार आहेत. मनपा अथवा अन्य सरकारी कार्यालयाने अडवून धरलेली कायदेशीर कामे संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेण्यासाठी हे अधिकारी पुढाकार घेणार आहेत.