आता पुन्हा गद्दारांचे झेंडे हाती घ्यायला लावू नका; बंडखोरांच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 04:58 PM2022-07-04T16:58:11+5:302022-07-04T17:00:01+5:30
बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.
औरंगाबाद : शिवसेनेत असताना गद्दारी करतात, पुन्हा पक्षात येतात. आता ते गद्दार पुन्हा पक्षात आले, तर त्यांचे झेंडे धरायला आणि सतरंज्या उचलायला लावू नका, असा जोरदार इशारा शिवसैनिकांनी रविवारी शहागंजमधील बाळाजी धर्मशाळेत झालेल्या मेळाव्यात दिला.
मध्य मतदारसंघातील आ. प्रदीप जैस्वाल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी हातमिळवणी करीत सरकारमध्ये सामील झाले. बंडखोर आमदारांच्या विरोधात शिवसेनेने मतदारसंघनिहाय रान पेटविले असून, पैठण, पश्चिम, वैजापूरनंतर रविवारी मध्य मतदारसंघात पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.याप्रसंगी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ.अंबादास दानवे, अशोक पटवर्धन, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बंडू ओक, अनिल पोलकर, मोहन मेघावाले, आनंद तांदूळवाडीकर, राजू पहाडिया, राजू इंगळे यांच्यासह महिला आघाडीच्या प्राजक्ता राजपूत आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील पाच आमदारांनी शिंदे यांच्या गटाला जवळ केले आहे. त्यामुळे पक्षाला मोठा हादरा बसला आहे. गावांत-वॉर्डात अनेकांशी शत्रुत्व घेत पक्षाच्या उमेदवारांना निवडून द्यायचे आणि त्यांनी स्वार्थासाठी बंडखोरी करायची. शिवसैनिकांकडून निष्ठेची अपेक्षा करायची आणि बंडखोरी करणाऱ्यांनाच पुन्हा उमेदवारी द्यायची, या प्रकारामुळे सामान्य शिवसैनिकांचे अवसान गळाले आहे.
आ. दानवे म्हणाले, पक्षप्रमुख ठाकरे यांच्यासोबत गद्दारी करणारे शिवसैनिक असूच शकत नाहीत. ज्यांनी गद्दारी केली, त्यांचे कार्यालयातील फोटो काढून फेका. त्यांना यापुढे विधानसभा दिसायला नको. शहरप्रमुख बाळासाहेब थोरात म्हणाले, शिवसेनाप्रमुखांनी कोळशाच्या खाणीतून आणून हिऱ्यासमान आकार दिला. चकाकी मिळाली की, शिवसेनाप्रमुखांच्या पुत्राचा गळा या बंडखोरांनी घोटला. ॲड. पहाडिया म्हणाले, यापुढे निष्ठावंतांचा विचार झाला पाहिजे. बंडखोरांविरोधात अनेकांनी भावना व्यक्त करीत एकतेची वज्रमूठ आवळली.
दोन्ही आमदारांवर खैरेंची टीका
शिवसेना नेते खैरे म्हणाले, आ. जैस्वाल यांना दोनवेळा मदत केली. तरीही त्यांनी बंडखोरी केली. आ. संजय शिरसाटांवर टीका करताना खैरे यांनी ‘रिक्षाचालकाकडे इतका पैसा आला कुठून’, असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघात कोट्यवधींची कामे केली, ती सगळी कामे घरच्यांनाच वाटली. एकही काम शिवसैनिकांना दिले नाही. पैसा आयुष्यभर पुरत नाही, असेही खैरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले.