पर्यटन नगरी औरंगाबादहून आता दुबई कनेक्टिव्हिटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:35 PM2020-01-07T12:35:42+5:302020-01-07T12:44:24+5:30
इंडिगोचे विमान देणार हवाईसेवा
औरंगाबाद : औरंगाबादहून अखेर बहुप्रतीक्षित ‘इंडिगो’ची ५ फेब्रुवारीपासून विमानसेवा सुरू होत आहे. मुंबईसाठी सकाळच्या वेळेत या कंपनीकडून विमानसेवा सुरू केली जात आहे. मुंबईमार्गे इंडिगोकडून दुबईसाठी सेवा दिली जाणार आहे. त्यामुळे औरंगाबादहून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी सुविधा होणार आहे.
दीड वर्षापूर्वी चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून औरंगाबाद ते थेट दुबई विमानसेवा सुरू करण्याचा प्रस्ताव ‘फ्लाय दुबई’ने दिलेला आहे. फ्लाय दुबईने केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाच्या सचिवांना वर्षभरापूर्वी हा प्रस्ताव सादर केला होता. पर्यटन आणि उद्योगाच्या दृष्टीने ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. औरंगाबादसह नागपूर, पुणे ही शहरे दुबई आणि भारत यांच्यातील विमानसेवा कराराबाहेरील आहेत; परंतु विशेष बाब म्हणून या शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या विमानसेवांमुळे रोजगारदेखील उपलब्ध होईल. पर्यटन आणि उद्योगवाढीला हातभार लागेल. दुबईत राहणाऱ्या महाराष्ट्रातील रहिवाशांना थेट कनेक्टिव्हिटी मिळेल, असे प्रस्तावात नमूद केले होते; परंतु या विमानसेवेची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यासाठी प्राधिकरणाकडून पाठपुरावा केला जात आहे.हा पाठपुरावा होताना इंडिगोकडून आता कनेक्टिटिंग फ्लाईटद्वारे औरंगाबाद शहर दुबईशी जोडले जाणार आहे. किमान कनेक्टिंग फ्लाईटने का होईना, औरंगाबाद दुबईशी हवाई सेवेने जोडले जाणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील प्रवाशांची सुविधा
मुंबईमार्गे इंडिगोकडून सेवा दिली जात आहे. औरंगाबादहून दुबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी फायदा होईल. शहरातून सकाळी मुंबईला जाऊन दुबईला जाणे शक्य होईल, असे विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी सांगितले.