आता आषाढातही शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:02 AM2021-07-17T04:02:02+5:302021-07-17T04:02:02+5:30

प्रशांत तेलवाडकर औरंगाबाद : आषाढ महिना व त्यानंतर संपूर्ण चतुर्मासात लग्न केले जात नाही. मात्र, यंदा काही पंचांगकर्त्यांनी आषाढातही ...

Now, even in hope, good luck! | आता आषाढातही शुभमंगल सावधान!

आता आषाढातही शुभमंगल सावधान!

googlenewsNext

प्रशांत तेलवाडकर

औरंगाबाद : आषाढ महिना व त्यानंतर संपूर्ण चतुर्मासात लग्न केले जात नाही. मात्र, यंदा काही पंचांगकर्त्यांनी आषाढातही ८ लग्नतिथी दिल्या आहेत. त्यानुसार शहरातील काही मंगल कार्यालयांत तारखा बुक झाल्या आहेत. या काळात बुकिंगचे प्रमाण कमी असले तरीही ज्यांचे विवाह कोरोनाच्या मागील वर्षाच्या लाॅकडाऊनपासून खोळंबले आहेत ते वधू-वर आता जास्त वाट न पाहता आषाढात लग्न उरकून घेणार आहेत.

शुभ मुहूर्तावर लग्न लावणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. शुभ मुहूर्त म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांची अनुकूल स्थिती. एखाद्या शुभ मुहूर्तावर लग्न केल्याने विवाह निर्विघ्न पार पडतात. तसेच त्या दाम्पत्याचे वैवाहिक जीवन सुखी राहते, अशी लोकांमध्ये भावना आहे. यामुळे बहुतांश जणांचा पंचांगामध्ये दिलेल्या लग्न तिथी व शुभ मुहूर्तावर लग्न लावण्याचा प्रयत्न असतो. आषाढात लग्न करावे की नाही, याविषयी पंचांगकर्त्यांमध्ये मतभिन्नता आहे. काहींनी मुख्य काळातील लग्न व काहींनी गौण काळातील लग्न तिथी दिल्या आहेत. मुख्य काळातील लग्नतिथी संपल्या आहेत. आता आषाढ महिना सुरू झाला आहे. आषाढ, चतुर्मासात लग्नतिथी नसते; पण आणीबाणीच्या परिस्थितीचा विचार करून यंदा पंचांगात गौण काळ संबोधून आषाढातही लग्नतिथी दिल्या आहेत. ११ जुलैपासून आषाढ मासारंभ झाला. ८ ऑगस्ट रोजी आषाढी आमावस्या होऊन आषाढाची सांगता होणार आहे. यादरम्यान १८, २२, २५, २६, २९ जुलै व ४ ऑगस्ट या गौण लग्नतिथी देण्यात आल्या आहेत. याच दरम्यान २३ जुलै रोजी चतुर्मासारंभ होत आहे. संपूर्ण चतुर्मासात म्हणजे ३० ऑक्टोबरपर्यंत ३८ लग्नतिथी आहेत. मागील वर्षी व यंदा लॉकडाऊनमुळे खोळंबलेले विवाह यंदा आषाढात केले जात आहेत. यामुळे मंगल कार्यालयांतून ‘शुभमंगल सावधान’चे सूर या काळात कानी पडतील.

चौकट

आषाढात लग्न टाळतात

पूर्वी आषाढ व चतुर्मासात लग्न केले जात नव्हते. मात्र, आता मुला-मुलींचे वाढते वय, घरातील अन्य अडचणी यामुळे अशा आणीबाणीच्या प्रसंगी ‘गौण’ मुहूर्त पंचांगात दिले जात आहेत. पण, या काळात देव विश्रांती घेतात, असे म्हटले जाते. लग्नासारखा आयुष्याला कलाटणी देणारा विधी देवा-ब्राह्मणांच्या साक्षीने करावा. म्हणून देव विश्रांती करीत असताना आषाढ व संपूर्ण चतुर्मासात विवाह करणे टाळले जाते.

माझ्या मते आषाढ व चतुर्मासात लग्न करणे टाळावे.

दुर्गादास मुळे गुरुजी

---

आषाढात लग्न मुहूर्त आहेत

पूर्वी वर्षातील ६ ते ८ महिने लग्न तिथी नसत. यात अनेकांची अडचण होत असे. यावर तोडगा म्हणून पूर्वीच्या नियमांप्रमाणे मुख्य काळात लग्नमुहूर्त द्यायचे आणि इतर ग्रंथांच्या आधारे चतुर्मासात व गुरू-शुक्र अस्तकालात ‘गौण’ लग्न मुहूर्त द्यायचे, असा निर्णय २०१९ मध्ये महाराष्ट्र व गुजरातमधील पंचांगकर्त्यांनी एकत्र येऊन घेतला. त्यासाठी सर्व पुरातण ग्रंथांचा अभ्यास करण्यात आला होता. यामुळे आषाढात लग्न करण्यास हरकत नाही.

सुरेश केदारे गुरुजी

----

शहरातील काही मंगल कार्यालय बुक

शहरातील काही मंगल कार्यालयांत आषाढातील काही तारखा बुक झाल्या आहेत. तर काही बोटावर मोजण्या इतक्या मंगल कार्यालयांत ऑगस्ट, सप्टेंबरच्याही काही तारखा लग्नासाठी बुक झाल्या आहेत. मंगल कार्यालयांच्या मालकांनी सांगितले की, मागील वर्षी लॉकडाऊनमुळे ज्यांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह पुढे ढकलले होते तेच आता या काळात लग्न उरकून घेत आहेत. अनेक जणांमध्ये अजूनही तिसऱ्या लाटेमुळे पुढे लॉकडाऊन लागू शकते याची भीती आहे. यामुळे आता अनलाॅक काळात ‘गौण’ लग्न मुहूर्तावर लग्न करण्याचा निर्णय वधू-वरांच्या पित्यांनी केला असल्याने मोजक्या तारखा बुक होत आहेत.

---

चौकट

परवानगी ५० जणांचीच; पण...

काही दिवसांपूर्वी मंगल कार्यालयांना त्यांच्या क्षमतेच्या ५० टक्के वऱ्हाडींना परवानगी दिली जात होती. मात्र, ही परवानगी जास्त काळ टिकली नाही. आता ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न पार पाडावे लागत आहे. मागील महिन्यात काही मंगल कार्यालये, लॉन्स येथे परवानगीपेक्षा अधिक वऱ्हाडी आढळून आल्याने तिथे दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाचे लक्ष मंगल कार्यालयांवर असल्याने कार्यालयाचे मालक स्वत: जातीने वऱ्हाडींच्या उपस्थितीवर लक्ष देत आहेत.

Web Title: Now, even in hope, good luck!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.