आता श्रीमंत असो की गरीब, सर्वांनाच ५ लाखांपर्यंत मोफत उपचार
By विजय सरवदे | Published: December 1, 2023 05:22 PM2023-12-01T17:22:43+5:302023-12-01T17:22:58+5:30
जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे.
छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शंभर टक्के नागरिकांना आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ५ लाखांपर्यंत मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे. मात्र, त्यासाठी आयुष्यमान भारत कार्ड अनिवार्य आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बीपीएलसह केशरी शिधापत्रिकाधारक अशा एकूण २३ लाख नागरिकांचे गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम आरोग्य विभागाने हाती घेतली आहे. परंतु, रेशन कार्ड आणि आधार कार्डवरील नावे जुळत नसल्यामुळे आशा वर्कर्संसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.
जे रेशन घेत नाहीत अथवा ज्यांनी रेशनकार्डच काढलेले नाही, त्यांना आयुष्यमान भारत कार्ड काढण्यासाठी महाराष्ट्राचा रहिवासी दाखला (अधिवास प्रमाणपत्र) आवश्यक आहे. या दाखल्याच्या आधारे स्वत: ऑनलाइन अथवा आपले सरकार सेवा केंद्रातून हे कार्ड काढता येते.
यासंदर्भात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी सांगितले की, जिल्हा आरोग्य विभागाने सध्या प्राधान्यक्रमाने जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसह केशरी शिधापत्रिकाधारकांचे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. शासनाने पूर्वी अशा ४ लाख ६० हजार कार्डधारकांचे उद्दिष्ट दिले होते. त्यानंतर १० लाखांचे उद्दिष्ट झाले. आता २३ लाख कार्डधारकांचे गोल्डन कार्ड काढण्याचे निर्देश आहेत. मात्र, अनेक कार्डधारकांची नावे पोर्टलवर अपलोड झालेली नाहीत. अनेकांची नावे रेशन कार्ड व आधार कार्डाप्रमाणे जुळत नाहीत (मिस मॅच). त्यामुळे आशा वर्कर्ससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. शासनाकडून यावर तोडगा काढला जात आहे. सध्या जिल्ह्यात २० टक्के अर्थात ४ लाख १० हजार नागरिकांचे कार्ड काढण्यात आलेले आहे.
जानेवारी अखेरपर्यंत मोहीम फत्ते
महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नागरिकांना सरकारी व खासगी दवाखान्यात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. आता आशा वर्कर्सचा संप मिटला असून १८३३ जणी कार्ड काढण्याच्या कामाला जुंपल्या आहेत. कार्ड काढण्यासाठी विशेष कॅम्पही लावले जाणार आहेत. जानेवारी अखेरपर्यंत कार्ड काढण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. धानोरकर यांनी व्यक्त केला.